महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर

महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर

Published on

महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर
केईएम रुग्णालयात ५०० अतिरिक्त खाटा उपलब्ध होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी टप्प्याटप्प्याने पुनर्विकास केला जात आहे. पुनर्विकासाचे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयात रुग्णांसाठी अतिरिक्त ५०० खाटा उपलब्ध होतील. त्‍यामुळे रुग्णालयात बेडची संख्या २,७५० पर्यंत वाढेल. बेडसोबतच रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधादेखील उपलब्ध होतील.

दररोज ४,००० रुग्ण
केईएम रुग्णालयात दररोज ४,००० रुग्ण ओपीडीमध्ये येतात. केवळ मुंबईहूनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येतात. याशिवाय दक्षिण-मध्य मुंबईत कोणतीही मोठी आपत्ती आल्‍यास बाधित लोकांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेता, पालिकेने केईएम रुग्णालयाचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. ही योजना टप्प्याटप्प्याने पुढे नेली जात आहे. गुरुवारी विधान परिषदेत भाजपचे सदस्य भारतीय यांनी केईएम रुग्णालयाच्या विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लेखी उत्तरात रुग्णालयाच्या विस्ताराबाबत सविस्तर माहिती दिली.


सद्य:स्थिती
दररोज चार हजार रुग्‍णांची ओपीडी
१,२०० हून अधिक खाटा
विस्तारीकरणानंतर २,७५० खाटांची सुविधा
तीन इमारतींंपैकी एका इमारतीचे काम २०२६ पर्यंत पूर्ण होईल.

हेलिपॅडदेखील बांधणार
केईएम रुग्णालयाच्या परिसरात आयुष्मान शताब्दी टॉवरचे बांधकामही विस्तार योजनेत प्रस्तावित आहे. या टॉवरमध्ये हेलिपॅडदेखील बांधले जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लेखी उत्तरात माहिती दिली आहे, की हेलिपॅड सुविधेच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात नेणे शक्य होईल.

इमारतीमध्ये पोडियम पार्किंग
केईएम रुग्णालय ४१,८०६ चौरस मीटर जागेवर पसरलेले आहे. या संकुलात ग्राउंड प्लस १८ मजली शताब्दी इमारत बांधली जात आहे. जून २०२६ पर्यंत शताब्दी इमारत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. याशिवाय ऑर्थोपेडिक इमारत संकुलात ग्राउंड प्लस २१ मजली कर्मचारी इमारतीच्या बांधकामासाठी पायाभरणी करण्यात आली आहे. नर्सिंग स्कूल आणि वसतिगृहाच्या भूखंडावर ग्राउंड प्लस ३२ मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये तीनमजली पोडियम पार्किंग बांधण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com