वसई, विरार, नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचे रॅकेट उघड
वसई, विरार, नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश
नालासोपारा, ता. ११ (बातमीदार) : वसई, विरार, नालासोपारा परिसरात एमडी या अमली पदार्थ विक्रीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात बोळिंज पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत एकाच गुन्ह्यातील १२ आरोपींना पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून ७१ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील अबेको व्होक्टरी या नायजेरियन आरोपी महिलेला शुक्रवारी (ता. ११) वसई न्यायालयात हजर केले आहे, तर इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
बोळिंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ मे रोजी विरार पश्चिम म्हाडा परिसरातून एमडीच्या विक्रीसाठी प्रथम एका आरोपीला अटक केली होती. याप्रकरणी बोळिंज पोलिसांना या तपासात एमडी विक्रीप्रकरणी मिरा रोड, नालासोपारा येथून प्रत्येकी तीन, विरारमधून दोन, तर ठाणे, काशी मिरा-काशीगाव, नायगाव आणि मुंबईतून प्रत्येकी एक अशा १२ आरोपींना अटक केली आहे. यात दोन महिला आरोपी असून, त्यातील एक नायजेरियन महिला आहे.
या आरोपींकडून १६८ ग्रॅम वजनाचे एमडी, एक स्काॅरपीओ, २६ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ७१ लाख ८८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.