शहापुरातील दमानी हायस्कूल सोमवारी सुरु करण्याची पालकांची मागणी

शहापुरातील दमानी हायस्कूल सोमवारी सुरु करण्याची पालकांची मागणी

Published on

... तर मंगळवारी आंदोलन
दमानी हायस्कूल सुरू करण्याची पालकांची मागणी
शहापूर, ता. ११ (वार्ताहर) : येथील आर. एस. दमानी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींचा मासिकधर्म तपासण्याच्या उद्देशाने त्यांना विवस्त्र केल्याच्या घटनेनंतर शुक्रवारी (ता. ११) चौथ्या दिवसापर्यंत शाळेतील शैक्षणिक कामकाज बंद असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. तसेच सोमवारी (ता. १४) संस्थाचालकांनी शाळा सुरू न केल्यास दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. १५) ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुक्रवारी दिला आहे.
आर. एस. दमानी इंग्रजी माध्यमाच्या खासगी संस्थेच्या शाळेत मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. ८) समोर आला होता. यामुळे संतप्त पालकांनी दुसऱ्या दिवशी शाळेतील शिक्षकांना जाब विचारून मुख्याध्यापिकेला घेराव घालण्यात आला. या घटनेनंतर शाळा प्रशासनावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु मागील चार दिवसांपासून शाळा बंद असून, पुढेदेखील काही दिवस शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.
या शाळेत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे, परंतु येथे शिकणाऱ्या सुमारे ६०० विद्यार्थ्यांचे गेल्या चार दिवसांपासून शैक्षणिक नुकसानदेखील सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन शाळा सुरू करावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल, अशी मागणी पुढे आली असून, सोमवारपर्यंत शाळा सुरू करा अन्यथा मंगळवारी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापनाला देण्यात आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com