शिस्तबद्ध गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक
शिस्तबद्ध गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक
कल्याण, ता. १३ (बातमीदार) : सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ मध्ये कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थापन झालेल्या ४० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ, देखाव्यातून जनजागृती करणारे मंडळ तसेच शिस्तबद्ध मंडळांचा गणराया पारितोषिकाने गौरव करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
विजयनगर गवळीनगर येथील शिवगर्जना मित्र मंडळ २०२४ मधील सर्वात शिस्तबद्ध मंडळ ठरले. या मंडळाला प्रथम पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले. चिंचपाडा रोड परिसरातील न्यू संघर्ष मित्र मंडळाने दुसऱ्या तर खडेगोळवलीतील अष्टविनायक सेवा मंडळाने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या सर्व मंडळांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या मंडळांची निवड करणारी निरीक्षण समिती सदस्य उमाकांत चौधरी, प्रवीण खाडे, शिवशंकर शाहू यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गणेशोत्सव मंडळांनी आगामी गणेशोत्सवामध्ये त्रासदायक असणाऱ्या डिजेचा वापर करू नये. त्याऐवजी पारंपरिक ढोल, ताशा अथवा बॅंजो अशा वाद्यांचा वापर करावा. मंडळांनी समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत, तसेच आपण इतरही मंडळांना आपल्याप्रमाणेच समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याबाबत संदेश द्यावा, असे आवाहन या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी केले. या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास २० मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य तसेच पोलिस मित्र उपस्थित होते. पारितोषिकाने सन्मान केल्याबद्दल गणेशोत्सव मंडळांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.