भिवंडी पालिकेत प्रभारी अधिकारी राज

भिवंडी पालिकेत प्रभारी अधिकारी राज

Published on

भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) : कोणतीही संस्था, शासकीय यंत्रणा कार्यक्षम असण्यासाठी तेथे आवश्यक कर्मचारी असणे गरजेचे असते. भिवंडी महापालिका त्याला अपवाद ठरली आहे. असेच काहीसे चित्र आस्थापना विभागातील आकडेवारीवरून समोर येत आहे. भिवंडी पालिकेत सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख पदावर प्रभारी म्हणून लिपिक बसले आहेत. पालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, सहाय्यक नगररचनाकार, मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, शहर अभियंता, वैद्यकीय अधिकारी या नऊ पदांवरील शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांशिवाय इतर सर्व अधिकारी, कर्मचारी हे प्रभारी म्हणून काम करीत आहेत.

सरकारी नियमानुसार वर्ग एकमधील पदांवर शासकीय सेवेतील अधिकारी व पालिका सेवेतील अधिकारी हे सम प्रमाणात असावेत; परंतु भिवंडी पालिकेत १९९६ नंतर पदोन्नती कोणत्याही कर्मचाऱ्याला दिली नसल्याने सर्वांना अधिकाराच्या पदावर प्रभारी म्हणून काम करावे लागत आहे. विशेष म्हणजे येथे वरिष्ठांच्या मर्जीतून क्षमता नसलेल्या कर्मचाऱ्यांकडेही जबाबदारीचे व जोखमीचे काम सोपवले जात आहे. ज्यामुळे पालिका प्रशासनाच्या कार्याचा खेळखंडोबा झाला आहे. पालिकेच्या सेवा व प्रवेश वर्गीकरणअंतर्गत सरकारने १४ डिसेंबर २०२२ मध्ये मंजुरी दिलेल्या आराखड्यानुसार पालिका सेवेत चार हजार १८९ पदे अस्तित्वात असून तीन हजार २३५ पदे भरली आहेत. तर तब्बल ९५४ पदे रिक्त आहेत.
लिपिक व वरिष्ठ लिपिक पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी कर्मचारी पदवीधर असणे आवश्यक आहे. पण, पालिका सेवेतील अनेक लिपिक कमी शैक्षणिक पात्रतेचे असल्याने पालिकेकडून सरकारने मंजूर केलेल्या सेवा व प्रवेश वर्गीकरण आराखड्यात दुरुस्ती सुचविली आहे. ती पुन्हा सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली आहे, अशी माहिती मिळते. विशेष म्हणजे प्रभारी म्हणून काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी अधिक; पण वेतन नियुक्तपदाचे मिळत असल्याने अनेकांना मानसिक ताण सोसावा लागत आहे.

वरिष्ठ लिपिक केवळ एकच
पालिकेचा प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी लिपिक व वरिष्ठ लिपिक मोठ्या संख्येने असणे गरजेचे आहे. वरिष्ठ लिपिक पदासाठी ४५ जण कार्यरत असणे आवश्यक असतानाही केवळ एकच सेवेत आहेत. तेसुद्धा येत्या ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. तर ४३३ कनिष्ठ लिपिक मंजूर असताना २५४ पदांवर कर्मचारी कार्यरत असून १८८ पदे रिक्त आहेत.


अतिरिक्त सफाईचा ताण इतरांवर
शहराच्या स्वच्छतेसाठी दोन हजार ४९१ सफाई कर्मचारी असणे गरजेचे आहे. त्यापैकी दोन हजार ३२१ कर्मचारी कामावर आहेत. त्यापैकी ५००हून अधिक कर्मचारी आपल्या सोयीच्या कार्यालयीन कामात असल्याने त्यांच्या कामाचा ताण इतर सफाई कर्मचाऱ्यांवर पडत आहे. ज्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न अनेक वेळा गंभीर बनतो.


काय सांगते पदांची आकडेवारी
मंजूर भरलेली रिक्त
वर्ग १.... ३४ ... १९... १५
वर्ग २.... ६० ... १० ... ५०
वर्ग ३ .... एक हजार ०७७ .... ४६८... ६०९
वर्ग ४ .... तीन हजार ०१८ ...दोन हजार ७३८... २८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com