विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवू नका

विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवू नका

Published on

विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवू नका अन्यथा घेराव
प्रहार जनशक्ती पक्षाचा डीएव्ही शाळेला इशारा
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : सीवूड्समधील डीएव्ही शाळेने इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता १२ हजार ४७० रुपयांची रक्कम रोख स्वरूपात मागितल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ही रक्कम भरल्याशिवाय मार्कशीट, स्थलांतर प्रमाणपत्र आणि बोनाफाइड प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असे प्राचार्यांनी स्पष्ट केल्याने अनेक पालक चिंतेत होते. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड. मनोज टेकाडे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे अडवू नयेत अन्यथा प्राचार्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा दिला आहे.
मनोज टेकाडे यांनी शुक्रवारी (ता. ११) डीएव्ही शाळेच्या प्राचार्या मुक्ता बरायण यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे डीजी लॉकरवर ऑनलाइन उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले. यासोबतच विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली १२ हजार ४७० इतकी अनामत रक्कम ३० ऑगस्टपूर्वी परत केली जाईल, असे लेखी आश्वासन प्राचार्यांनी दिले.
कोरोना काळात २०१९-२० दरम्यान राज्य सरकारने २० टक्के शुल्कमाफीचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार काही शाळांनी सूट दिली होती. परंतु, यंदा कोणतीही लेखी नोटीस न देता डीएव्ही शाळेने रक्कम वसूल केली, असा आरोप पालकांनी केला होता. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकाराने सुमारे ३०० विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या कागदपत्रांसह अनामत रक्कम वेळेवर मिळणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मार्क्सशीट, मायग्रेशन सर्टिफिकेट, बोनाफाइड प्रमाणपत्र याबाबतची अडवणूक कोणत्याच शाळा व्यवस्थापनाने करू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते किंवा वर्ष वाया जाऊ शकते. विद्यार्थ्यांची मार्क्सशीट, मायग्रेशन सर्टिफिकेट आणि बोनाफाइड अडवू नये अन्यथा तक्रार आलेल्या शाळा प्राचार्यांना प्रहारचा कार्यकर्ता घेराव घातल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे मनोज टेकाडे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com