रेल्वे स्थानक परिसराला कोंडीचा विळखा
रेल्वेस्थानक परिसराला कोंडीचा विळखा
संथगती कामाचा चालकांना फटका
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ ः कल्याण पश्चिम रेल्वेस्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाणपूल, बस आगाराचे नूतनीकरण, स्थानक परिसराचा विकास, नाले बांधणी व अन्य बहुउद्देशीय विकासकामे सुरू आहेत; मात्र संथगतीने सुरू असलेल्या या कामांचा वाहनचालकांना फटका बसत असून स्थानक परिसराला कोंडीचा विळखा पडत आहे. रिक्षा, दुचाकी व खासगी वाहनचालक या कोंडीत अडकून पडत असून, यामुळे रेल्वे प्रवाशांना वेळेत लोकल पकडणेदेखील मुश्किल झाले आहे. पालिका प्रशासनाने या कामांवर लक्ष देत ती वेळेत पूर्ण करून घ्यावी. वाहतूक विभाग, पोलिस प्रशासनाशी चर्चा करून कोंडी फोडण्यासाठी वाहतुकीत बदल करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
उल्हासनगर, विस्तारित कल्याण, भिवंडी आणि शहापूर परिसरातून दररोज हजारो नागरिक रिक्षा व खासगी वाहनांतून कल्याण पश्चिम स्थानकात दाखल होतात; परंतु छाया सिनेमा ते रेल्वेस्थानकदरम्यान अवघ्या पाच ते सात मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अनेकदा अर्ध्या तासाचा कालावधी लागतो. वाहतूक पोलिस आणि सेवकांची अनुपस्थितीत, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अरुंद रस्ते आणि बेशिस्त रिक्षा यामुळे हा मार्ग अधिक अडचणीचा बनतो आहे. रेल्वेस्थानक परिसरात पदपथ आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजू फेरीवाल्यांनी व्यापल्या आहेत. महापालिकेचे पथक फक्त दिखावा कारवाई करीत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. रस्त्यांवरील एकदिशा मार्गिकांची योग्य अंमलबजावणी न केल्यामुळे रिक्षाचालक उलट दिशेने वाहने चालवत असून, यामुळे अधिकच गोंधळ निर्माण होतो.
कल्याण रेल्वेस्थानक हे जंक्शन असून परगावी प्रवास करणारे प्रवासी या स्थानकात येऊन एक्स्प्रेस पकडतात. तसेच कल्याण, भिवंडी, कल्याण ग्रामीण, मुरबाड पट्ट्यातील नागरिक लोकलने प्रवास करावयाचा असल्यास कल्याण रेल्वेस्थानकात येतात. कल्याण येथे बाजारपेठ, शासकीय कार्यालय, न्यायालय, एसटी थांबा असल्याने तेथे येणारे प्रवासीदेखील स्टेशन परिसरातून येतात. शिळफाटा, मुरबाड, भिवंडी येथून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहने येतात. मागील पाच-सहा वर्षांपासून सुरू असलेले स्मार्ट सिटीचे प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे. त्याला अधिक विलंब झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
मेट्रो प्रकल्पामुळे आणखी गोंधळ
कल्याण शहरात मेट्रो मार्गाचे काम बैलबाजारातील गोविंद करसन चौक ते गुरुदेव हॉटेलदरम्यान सुरू आहे. रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम आणि खांब उभारणीमुळे अर्धेअधिक रस्ते या कामाने व्यापले आहेत. यामुळे रस्ते अरुंद झाले असून, वाहतूक कोंडीने या भागात दररोज नागरिक त्रस्त आहेत.
रस्त्यावरच रिक्षा, वाहनतळांचा अभाव
कल्याण पश्चिम रेल्वेस्थानकाजवळ मुरबाड रस्ता ते वलीपीर रस्त्यादरम्यान उड्डाणपूल उभारणीचे कामही सुरू आहे; मात्र रिक्षाचालक मुख्य रस्त्यांवरच रिक्षा उभी करून प्रवासी घेत आहेत. दीपक हॉटेल चौक तसेच रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच रिक्षा उभ्या करून प्रवासी घेण्याचे प्रकार पाहायला मिळतात. यामुळे रस्ता कमी पडतो व चेंगराचेंगरीचे प्रसंग ओढवतात.
नियमांचे उल्लंघन
मुरबाड, भिवंडी, शहापूर परिसरातून वाहनधारक बाजारपेठेत खरेदीसाठी येतात. ही वाहने मुख्य रस्त्यावर उभी राहत असल्याने स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाजी चौक, अत्रे रंगमंदिर ते सुभेदारवाडा शाळा आणि शिवाजी चौक ते पारनाका भागात दुकानदार स्वतःची वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.