खड्ड्यांमुळे मंदावला वाहनांचा वेग
मुंबईचे प्रवेशद्वाराला कोंडीचा विळखा
पनवेल, ता. १२ (बातमीदार) ः मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून पनवेलचा उल्लेख होतो. शहरात प्रवेश करताना पळस्पे फाट्याजवळ मुंबई-गोवा, जेएनपीए महामार्ग आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गा एकत्र येतात; मात्र याठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि दररोज कोंडीची समस्या उद्भवते. सकाळ-सायंकाळी अथवा वीकेण्ड, सुट्टीच्या दिवशी परिसरात तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. यात वेळ आणि इंधन खर्ची पडत असल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पळस्पे फाट्यावर तीन महामार्ग एकत्र येत असून कळंबोलीप्रमाणेच पळस्पे फाटा एक मोठे जंक्शन आहे. येथून अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. जेएनपीए बंदरात दिवसभर मालवाहनांची वर्दळ सुरू असते. पळस्पे फाट्यादरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले. जेएनपीए मार्ग सिमेंटचा असला तरी जंक्शनवरील रस्ता चारही बाजूंनी डांबरी आहे. विशेष करून, गोव्याकडून जेएनपीए आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे.
मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पळस्पे फाट्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या ठिकाणचे डांबर वाहून गेले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने अंदाज येत नाही, त्यामुळे वाहने उसळून अपघात होत आहेत. दुचाकी घसरण्याचे प्रकारही वाढले आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पळस्पे जंक्शनवर दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
मुंबई-पुणे महामार्ग, जेएनपीएकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो. संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, रस्ता खराब झालेल्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यानंतर सेवा रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जेएनपीएचा सेवा रस्ताही खड्डेमय
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार बी तीन हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. त्याच्या बाजूला सेवा रस्ताही तयार करण्यात आला आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून अवजड वाहनांमुळे काही महिन्यांतच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सेवा रस्ता काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव असला तरी त्याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत.
महामार्गावर मालवाहतूक करीत असताना हजारो रुपये टोल भरावा लागतो. त्याचबरोबर वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून ऑनलाइन दंड आकारला जातो. अनेक अडचणींना वाहतूकदारांना सामोरे जावे लागते. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब होतो. शिवाय, वाहनेही नादुरुस्त होत आहेत.
- गोविंद साबळे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.