भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण

भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण

Published on

भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण
ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या लौकिकात भर

तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : ज्वेल ऑफ नवी मुंबई हे नवी मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आता याठिकाणी २.८० मीटर उंचीचा भगवान गौतम बुद्धांचा ध्यानमग्‍न पुतळा साकारण्यात आल्‍याने परिसरातील सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीनुसार व पाठपुराव्यामुळे हा पुतळा साकारण्यात आला आहे. शनिवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
गौतम बुद्धांच्या पुतळ्यामुळे ज्वेल ऑफ नवी मुंबईला तेजस्विता प्राप्त झाली आहे. स्‍मार्ट शहराबरोबरच सांस्कृतिक शहर म्हणूनही नवी मुंबईचा विकास व्हावा. भगवान गौतम बुद्धांच्या पंचतत्त्वांची अंमलबजावणी करणारे शांतताप्रिय शहर म्हणून नवी ओळख निर्माण व्हावी, असे मनोगत या वेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्‍त केले.
बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे यांनी, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात साकारत असल्याचा आनंद व्यक्त केला. जगातील लोकांना युद्ध नको तर शांतीचा संदेश देणारे बुद्ध हवे, अशा शब्दात त्‍यांनी बुद्ध विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. या ठिकाणाला भेट देणारे नागरिक शांती आणि समाधानाचा संदेश घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त करीत पुतळ्याच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विशेष उल्लेख केला. आगामी काळात नवी मुंबईत संविधान शिल्प व भवन तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयएएस अभ्यासिका सुरू करण्याची मागणी म्‍हात्रे यांनी केली. कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, माजी महापौर सुधाकर सोनवणे व जयवंत सुतार, माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी विरोधी पक्षनेते नामदेव भगत, डॉ. राजेश पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, पुष्परोपाची कुंडी आणि संविधान उद्देशिकेची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

योगदान देणाऱ्यांचा सन्मान
पुतळा स्थापन करण्यासाठी योगदान देणारे शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, उपअभियंता पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता सुनील कोकाटे, पुतळ्याचे शिल्पकार प्रदीप शिंदे, तसेच संबंधित व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. भन्ते प्रज्ञानंद यांनी वंदना सादर करून अनावरण सोहळ्यास प्रारंभ केला. महिला लेझीम पथकाने सोहळ्यातील आनंद द्विगुणित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com