मुक्या प्राण्यांवर बोलकं प्रेम
प्रसाद जोशी, वसई
अनेकांना मुक्या प्राण्यांचा लळा असतो. मात्र भटक्या मुक्या प्राण्यांना होणाऱ्या वेदना, त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी, भूक लागली की खायला मागायचे तरी काय, त्यांच्या भावना समजणार तरी कशा, असे प्रश्न अनेकांसमाेर असतात. अशा भटक्या जनावरांना मदत करता यावी म्हणून वसई परिसरातील पाच तरुण एकत्र आले आणि या मित्रांनी भटक्या प्राण्यांवरचे बोलके प्रेम जगाला दाखवून दिले. त्यांच्यासाठी निवारा केंद्र असो की जेवणाची व्यवस्था, त्यांच्या आरोग्याची देखभाल करू लागले. वसईत श्वानांसाठी पावसाळी घरकुलदेखील तयार करण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी ही छोटीशी घरकुले उभारल्याने नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
नोकरदार असणारी अंशी सिंग, श्रद्धा वंजारी, जॉनाथन गोवेस, मनीषा रोरा, ओमकार मिस्त्री हे आहेत शहरातील श्वानांचे मदतगार. या मुक्या जनावरांवर उपचार करण्यासाठी पुढे आल्यावर त्यांची एकमेकांशी ओळख झाली. यातूनच त्यांनी मुक्या प्राण्यांना अधिकाधिक मदत करायचे ठरवले. भटकी कुत्री, गाय, बैलांसह अन्य पशुपक्ष्यांसाठी मदतीला एक नव्हे तर अनेक हात पुढे आले. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांच्याकडून भटक्या प्राण्यांसाठी सेवा दिली जात आहे. आतापर्यंत अंदाजे २५० श्वानांची त्यांनी सुटका केली आहे. यात एका श्वानाला ट्युमर झाला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. अनेकदा रस्त्यावरील गायी अपघातांमध्ये जखमी होतात. त्यांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी त्यांचे पथक प्रयत्न करते. भटके प्राणी आपलेच आहेत, या मायेने त्यांच्या अंगावरून हात फिरवत त्यांना आधार दिला जातो.
वसई पश्चिमेतील सनसिटी-गास मार्गावर पावसाळ्यात पाणी साचते. या वेळी या परिसरातील श्वानांना आडोसादेखील नसतो. येथील संपूर्ण परिसर मोकळा असल्याने त्यांना अडचण निर्माण होते, म्हणून या पाच जणांनी मिळून तात्पुरता निवारा तयार केला आहे. आतापर्यंत एकूण सहा ठिकाणी काम पूर्ण झाले आहे, तर अद्याप चार ठिकाणी तात्पुरता निवारा उभारला जाणार असल्याची माहिती अंशी, श्रद्धा, मनीषा, ओमकार, जॉनाथन यांनी दिली.
निवाऱ्यासाठी बांबू, ताडपत्री, प्लायचा वापर करण्यात आला आहे. हे काम करण्यासाठी त्यांना अरविंद कदम यांनी मदत केली. पाऊस आल्यावर येथील भटके कुत्रे, त्यांची पिल्ले या निवारा शेडमध्ये राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यांची खाण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन जण येथे नित्यनेमाने येतात. त्यामुळे पावसाच्या दिवसांत डोक्यावर छत आणि पोटाची भूक भागत आहे.
भटकी जनावरे, पक्ष्यांसाठी अनेक संस्था काम करतात. हे तरुण मित्र ना कोणती संस्था, ना आर्थिक मदत मागतात. अनोळखी जीवांवर जीव ओवाळून टाकत आहेत. त्यामुळे त्यांचे केवळ कौतुकच केले जात नाही, तर त्यांना शाबासकीदेखील दिली जात आहे, हे वाखाणण्यासारखे म्हणावे लागेल.
ठाणे, नाशिकहून साधला जातो संपर्क
ॲनिमल शेल्टर उभारल्यानंतर त्याची माहिती वसईच्या बाहेर गेली. नाशिक, ठाण्यासह राज्याच्या विविध भागांतून त्यांना संपर्क साधला जातो. कशा प्रकारे नियोजन केले, तात्पुरते शेल्टर कसे तयार केले याची माहिती अनेक श्वानप्रेमींकडून घेतली जात आहे. त्यामुळे हा प्रयोग केवळ वसईपुरता मर्यादित न राहता भविष्यात महाराष्ट्रातील मुक्या प्राण्यांना आधार देणारा ठरणार आहे.
मुके प्राणी बोलू शकत नाहीत. ते कधी आजारी असतात, अशातच काहींचा मृत्यू होतो. मनुष्याप्रमाणे त्यांचाही जीव महत्त्वाचा आहे. मानवाचे कर्तव्य आहे की त्यांना मदत केली पाहिजे. प्रत्येकाने त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. मुक्या जनावरांना आरोग्य, आहार योग्य प्रमाणात मिळेल यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
- अंशी सिंग, प्राणीप्रेमी, वसई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.