पालघर बाल कामगारमुक्त करण्यासाठी जनजागृती करावी
पालघर, ता. १३ (बातमीदार) : जिल्ह्यातून बाल कामगार प्रथा संपवून ‘बाल कामगारमुक्त जिल्हा’ करण्यासाठी संबंधित विभागांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच विविध खासगी आस्थापनांवर धाडी टाकाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले.
जिल्हाधिकारी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक नुकतीच झाली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, कामगार उप आयुक्त विजय चौधरी, तसेच जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीचे सदस्य उपस्थित होते. या वेळी विविध समितींच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी जाखड यांनी घेतला. पालघर जिल्ह्यात आढळून आलेले, तसेच रहिवासी असलेले वेठबिगार कामगारांना तत्काळ आर्थिक साह्य देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, तसेच जास्तीत जास्त असंघटित कामगारांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी जाखड यांनी दिले.
विविध शासकीय विभाग, शाळा, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेऊन बाल कामगारांविरोधात व्यापक जनप्रबोधन राबवावे. बाल कामगार प्रथेला कायमचा आळा बसवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिक, प्रशासन, शिक्षक, पालक आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास पालघर जिल्हा बाल कामगारमुक्त होऊ शकतो, असा विश्वास जाखड यांनी व्यक्त केला.