म्हाडाच्या ठाणे, पालघरमधील ५ हजार घरांची बंपर लॉटरी म्हाडाच्या ठाणे, पालघरमधील ५ हजार घरांची बंपर लॉटरी
म्हाडाच्या ठाणे, पालघरमधील पाच हजार घरांची बंपर लॉटरी
आजपासून अर्ज भरता येणार; २५-६० लाख रुपये किंमत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर व जिल्हा, पालघर आणि जिल्ह्यातील तब्बल पाच हजार २८५ घरांच्या विक्रीसाठी बंपर लाॅटरी जाहीर केली आहे. त्यानुसार इच्छुकांना सोमवारी (ता. १४) दुपारी १ वाजल्यापासून म्हाडाकडे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत, तर लाॅटरीची संगणकीय सोडत ३ सप्टेंबर रोजी काढली जाणार आहे. या लाॅटरीतील घरांच्या किमती २५ लाखांपासून ६० लाखांपर्यंत आहेत.
कोकण मंडळातर्फे जाहीर केलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागली आहे. त्यानुसार २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३,००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहेत त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १,६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सदर सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत सोमवार १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाइन व पारदर्शक असून, यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त अर्ज भरावेत, असे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी सेवती गायकर यांनी केले आहे.
७७ भूखंड
कोकण मंडळाच्या या लाॅटरीच्या माध्यमातून ७७ भूखंडांचीही विक्री केली जाणार आहे. सदरचे भूखंड कुळगाव बदलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस येथे उपलब्ध आहेत.
कधीपर्यंत अर्ज करता येणार
- १४ जुलै दुपारी १ वाजल्यापासून १३ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
- १४ ऑगस्ट, २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील.
- सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील.
- सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
- ३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे.
- सोडतीत सहभाग घेण्याकरिता अर्जदार आयएचएलएमएस २.० ही सोडतीची संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड अथवा आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमच्या सहाय्याने आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकतात. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.