निकृष्ठ धान्य पुन्हा बाजारात
निकृष्ठ धान्य पुन्हा बाजारात
ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश; दोघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : आमदार भवनातील निकृष्ट जेवणावरून आमदारांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा प्रकार सध्या गाजत आहे. पण सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचणारे धान्य खरेच खाण्याजोगे असते का, असा प्रश्न ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून आता उपस्थित झाला आहे. गुन्हे शाखेने शिळ डायघर परिसरातील धान्य रिसायकलिंग कंपनीच्या दोन गोदामांवर धाड टाकली असता, कालबाह्य निकृष्ट दर्जाचे धान्य पुन्हा बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. एका नामांकित ऑनलाइन कंपनीने हे कालबाह्य धान्य नष्ट करण्यासाठी दिले होते. दरम्यान, याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
नोकरदारवर्गासाठी सध्या ऑनलाइन खरेदी ही वेळेची आणि पैशांची बचत करणारी ठरत आहे. त्यामुळे बाजारात आजच्या घडीला अनेक ऑनलाइन कंपन्या चपलांपासून ते महागड्या दागिन्यांपर्यंत आणि अन्नधान्यापासून ते तयार जेवणापर्यंत सर्वच सेवा झटपट देत आहे. या ऑनलाइन बाजारातील एका कंपनीकडून कालबाह्य ठरणारा माल वेळोवेळी नष्ट केला जातो, असा दावा करण्यात आला आहे. पण नष्ट करण्यासाठी दिलेल्या आपल्या मालाची योग्य रीतीने विल्हेवाट लागते की नाही, याकडे या कंपनीने दुर्लक्ष केल्याचा फायदा काळाबाजार करणारे रॅकेट घेत असल्याचे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईन उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीकडून कालबाह्य म्हणजे एक्सपायरी झालेले सर्व प्रकारचे कडधान्य, त्यांच्या डाळी, पीठ, सुकामेवा, साखर तसेच चॉकलेट, कॉस्मेटिक, सॅनेटरी प्रॉडक्ट्स असा माल ठाणे, शिळ डायघर येथील दहिसर नाका येथील ‘इको स्टार रिसायकलिंग’ या कंपनीत विल्हेवाट लावण्यासाठी पाठविला जात होता; मात्र या मालाची विल्हेवाट न लावता तो बेकायदा खुल्या बाजारामध्ये विक्री केली जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून इको स्टार रिसायकलिंग अॅण्ड इ वेस्ट रिसायकलिंग कंपनीच्या मुंब्रा-पुणे रोडवरील दहिसर नाका येथील आणि गरीब नवाज इस्टेट पनवेल रोड येथील दोन गोदामांवर ९ आणि १० जुलै रोजी धाड टाकली. या दोन्ही गोदामांत विल्हेवाट लावण्यासाठी दिलेले धान्य आणि इतर समानाचे घबाड सापडले. सुमारे २०० टन माल तिथे आढळून आला. या सामानाचे आवरण काढून त्याचे नव्याने पॅकेजिंग तेथे होत असल्याचे आढळले.
नमूद मालाच्या मूळ कंपनीचे आवरण काढलेले अंदाजे १२ हजार किलो (१२ टन) वजन असा सुमारे ३० लाख रुपये किमतीचा माल सुट्टा करून तो साध्या प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशव्यांमध्ये व गोणींमध्ये भरला होता. पुढे हा माल बाजारात स्वस्त नावाने पुन्हा विक्रीसाठी पाठवण्यात येणार होता, असे पोलिसांनी सांगितले. निकृष्ट दर्जाचे हे धान्य आणि इतर वस्तू भिवंडी आणि आजूबाजूच्या परिसरात विक्रीसाठी पाठवण्यात येणार होत्या, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात आढळली आहे. यासाठी नवकार रिसायकलिंग या कंपनीचे बनावट चलन तयार केले होते.
अटक आरोपींना पोलिस कोठडी
दोन्ही गोडाऊन मालकांविरोधात शिळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत मुंबई, साकीनाका येथील मोहम्मद मुनीर चौधरी (४१) आणि भिवंडीतील मोहम्मद इस्माईल शेख (५८) या दोन गोदाम मालकांना गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने येत्या १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा, घटक-१ हे करीत आहेत.
सावध राहण्याचे आवाहन
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी छापा टाकण्यात आला. तसेच तो माल जप्त केला असून त्याचा साठा करणाऱ्या गोदामाच्या दोन मालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. तसेच ‘स्वस्त’चे प्रलोभन दाखवून जर कुणी धान्य किंवा वस्तू बाजारात विक्री करीत असेल, तर त्याला न भुलता त्याची योग्यता तपासा, असे आवाहन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.