नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
नवी मुंबई विमानतळाला मुदतवाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कामांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत येथील कामाचा आढावा देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १२) घेतला. या वेळी अदाणी समूह आणि सिडकोतर्फे विमानतळाच्या प्रगतीबाबतचे सादरीकरण करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत टर्मिनल इमारत ते रेल्वेपर्यंतची सर्व माहिती घेतली आहे. ‘विमानतळाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. रनवे सुसज्ज आहे. टर्मिनल इमारतीच्या अंतर्गत सजावटीचे काम सुरू आहे. प्रवाशांचे सामान हाताळण्याची व्यवस्था जगातील अतिशय वेगवान करण्याच्या सूचना केल्या आहेत. येथील दोन रनवेहून नऊ कोटी प्रवाशांसाठी सुसज्ज टर्मिनल होणार आहे. हे ग्रीन एअर पोर्ट असून, या ठिकाणी ३६ मेगावॉट हरित ऊर्जा वापरली जाणार आहे. येथील सर्व वाहने विजेवर किंवा पर्यायी इंधनावर चालणारी आहेत. या विमानतळावर सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअल वापरले जाणार आहे. येथे उडणारी विमाने ग्रीन फ्युएल वापरतील, असा प्रयत्न राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या विमानतळाला मोठी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणीअंतर्गत भुयारी मेट्रो धावणार आहे. ते सर्व टर्मिनलला जोडले जाणार आहेत. कोणालाही पायी चालण्याची गरज नाही. प्रवाशांना स्वतःचे वाहन आणण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
अटल सेतूचा कोस्टल रोड २०२६ मार्चपर्यंत पूर्ण होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचवल्याप्रमाणे ठाण्यापासून एलिव्हेटेड मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी मेट्रो, रेल्वे, वॉटर ट्रान्स्पोर्ट विकसित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
डेडलाइन डेड करू नका!
नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत अदाणी समूह व सिडकोला दिली आहे. या ठिकाणी सध्या १३ हजार कामगार काम करीत आहेत. ही संख्या दुप्पट करा, सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. कमर्शिअल उड्डाण घेण्यासाठी इतर आवश्यक परवानग्या घेण्याचे काम समांतर पातळीवर सुरू आहे, जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिल्यावर आपल्याला लगेच काम सुरू करता आले पाहिजे. पण यांनी आमची डेडलाइन डेड करू नये, अशी तंबीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिली.
‘एपीएमसी’ स्थलांतराचा विचार नाही!
वाशीतील एपीएमसी मार्केट स्थलांतर करण्याचा अद्याप कोणताही विचार नाही. मात्र नवीन आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नवीन जागा पाहावी लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वाशी येथे सिडकोने दिलेल्या जागेवर १९८०च्या दशकापासून एपीएमसी मार्केट तयार केले आहे. मात्र आता या इमारती जुन्या झाल्यामुळे जीर्ण होऊ लागल्या आहेत. एपीएमसीतील कांदा-बटाटा मार्केट जीर्ण होऊन मोडकळीस आले आहे. गेल्या १० वर्षांपासून अधिक काळ या मार्केटचे पुनर्वसन घोंगडे भिजत आहे. त्यामुळे ही इमारत स्थलांतर होण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र फडणवीस यांनी हे मार्केट कुठेही स्थलांतर करीत नसल्याचे स्पष्ट केले. उलट आंतरराष्ट्रीय नवीन कायद्यानुसार नवीन मार्केट बांधावे लागणार आहे. ते करताना कुठे बांधायचे, याबाबत माथाडी कामगार, शेतकरी आणि व्यापारी यांना विश्वस्त घेऊन हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याबाबत मंत्रालय स्तरावर पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
- मुंबई आणि एमएमआर परिक्षेत्रातील सर्व प्रकल्प महायुतीच्या काळातील आहेत. मधल्या महाविकास आघाडीच्या अडीज वर्षांच्या काळात या विकासकामांचा वेग मंदावली होता. ज्या विकासकामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले, आज त्याच कामांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्याचे फार कौतुक वाटत आहे.
- १२ किल्ले युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे किल्ल्यांचे संवर्धन करण्यास वेळ लागतो. त्यामुळे काही किल्ले राज्य पुरातत्त्व विभागाकडे वर्ग केल्यास त्यांच्या नियमानुसार या किल्ल्यांचा अधिक वेगाने विकास करता येईल. उदा. रायगड, शिवनेरी, प्रतापगड या किल्ल्यांचे संवर्धन जसे सुरू आहे. राज्य सरकारकडे किल्ल्याचा विकास करण्यास मुबलक पैसा आहे. मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून विविध परवानग्या येण्यास वेळ लागतो. त्यामुळे हे किल्ले राज्य पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करण्यात यावे.
टेस्टिंग बोर्डिंग पासवर स्वाक्षरी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पाहण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विमानतळ कंपनीकडून टेस्टिंग बोर्डिंग पास देण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी स्वाक्षरी करून दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.