अंगणवाडी सेविकांना नोटिसा
अंगणवाडी सेविकांना नोटिसा
निकृष्ट दर्जाचा पोषण आहारप्रकरणी कारवाई
नवीन पनवेल, ता. १२ (बातमीदार) : पनवेलमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी सुहिता वाव्हळ यांनी संबंधित अंगणवाड्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटिसा काढून बचत गटांच्या प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक शुक्रवारी (ता. ११) घेतली.
विद्यार्थ्यांचे पोषण व्हावे, यासाठी अंगणवाडीतील बालकांसाठी बचत गटांकडून आहार शिजवून मागवला जातो. त्याच्या दर्जाबाबत पालकांनी ‘सकाळ’कडे तक्रारी मांडल्या होत्या. याची दखल प्रशासनाने घेतली असून बालविकास प्रकल्प अधिकारी सुहिता वाव्हळ यांनी याप्रकरणी कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले, ‘बचत गटांकडून अंगणवाड्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण दिला जात असल्याचा प्रकार लक्षात येताच अंगणवाडी सेविकांनी याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे करावी. या प्रकाराला पर्यवेक्षिकांना का जबाबदार धरण्यात येऊ नये, अशा सूचना आल्यानंतर पर्यवेक्षिकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना भेटी दिल्या. यामध्ये स्तनदा, गर्भवती माता आणि तीन वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी असलेला पोषण आहार कोणीच नेत नसल्याने या पर्यवेक्षिकांकडून पालकांचे समुपदेशन करण्यात आले.’ दरम्यान, पोषण आहार फक्त लाभार्थ्यांसाठी दिला जातो. कोरोना काळात तात्पुरता सुरू केलेला पोषण आहार बालकाच्या घरातील सर्वच जण खात होते. आता नवीन पोषण आहारात पौष्टिक गुणधर्म, त्याचा उपयोग याविषयी लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली. परंतु वारंवार समुपदेशन करूनही पनवेल प्रभागातील अंगणवाडी क्रमांक नऊमध्ये तिसऱ्या दिवशीही पोषण आहार पडलेलाच दिसून आला.
बचत गटाला २०० रुपयांचा दंड
‘बचत गटांची ऑनलाइन बैठक घेऊन याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत. घटनेची चौकशी करून पोषण आहारात हलगर्जी करणाऱ्या बचत गटाला २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्या दोन जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. वारंवार त्याच बचत गटाची तक्रार आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल,’ असे पनवेल शहराच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सुहिता वाव्हळ यांनी सांगितले. पनवेल ग्रामीणमध्ये अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषण आहार साठा पडून आहे. याबाबत ग्रामीण विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रविण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र संबंधित अंगणवाड्यांच्या पर्यवेक्षिकांना तशा सूचना केल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.