कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

कल्याण गायन समाजाचे शताब्दी वर्षात पदार्पण
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : शतकी वाटचाल करणाऱ्या मोजक्याच संस्थांच्या पंक्तीत बसण्याचा मान कल्याण गायन समाजाने नुकताच प्राप्त केला. गुरुवारी (ता. १०) कल्याण गायन समाजाने ९९ वर्षे पूर्ण करून शताब्दी वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने कल्याण पश्चिम येथील लक्ष्मीनारायण मंदिरात संस्थेच्या वतीने वेदमूर्ती दिलीप गोडसे आणि कमल बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली ईशस्तुती या महिला मंडळाने लघुरुद्र पठण केले. कल्याण गायन समाजाच्या व शताब्दी वर्षाच्या समितीमधील सर्व कार्यकर्ते या धार्मिक कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित होते. संस्थेचे ट्रस्टी नंदकिशोर मुजुमदार यांनी यजमानपद भूषविले. सायंकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेला असेच दीर्घायुष्य लाभो या भावनेतून राम जोशी यांच्या संकल्पनेनुसार वटवृक्षाच्या प्रतिकृतीसमोर १००वा दिवा आयुक्तांनी प्रज्वलित केला. आयुक्तांनी समाजाचे शताब्दी वर्षानिमित्त कौतुक केले, तसेच आमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. त्यानंतर भास्करबुवा बखले यांच्या स्वरचित तसेच त्यांनी लोकप्रिय केलेल्या बंदिशींवर आधारित एक विशेष कार्यक्रम संस्थेच्या शिक्षकांनी सादर केला. ललितागौरी रागातील बंदिशीने सुरू झालेला हा कार्यक्रम, मारवा, बिहाग, श्री, हमीर अशा विविध रागांतील बंदिशी आणि नाट्यगीतांनी नटला होता. कौस्तुभ आपटे, मनीषा घारपुरे, मृदुला साठे, मेघना भावे, स्वाती मुजुमदार यांच्या गायनाला ईशान भट, स्नेहल धामापूरकर, स्वप्नील भाटे यांनी तबल्यावर तर अनिरुद्ध गोसावी, दीपक घारपुरे, हर्षल काटदरे यांनी हार्मोनियम व ऑर्गनवर साथ दिली.
...................
विद्या मंदिर शाळेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
टिटवाळा (वार्ताहर) : छत्रपती शिक्षण मंडळाच्या विद्या मंदिर मांडा, टिटवाळा शाळेत माध्यमिक शालान्त परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शनिवारी (ता. १२) गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ना. के. फडके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सोनवणे कॉलेज, कल्याण येथील प्राध्यापक सतीश पंडित उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सहावी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. या सादरीकरणाचे मार्गदर्शन शिक्षक भीमराव झाल्टे आणि केतकी कान्हेरे यांनी केले. मुख्याध्यापक दिनेश भामरे यांनी विद्यार्थ्यांना निर्णयक्षमता वाढवून मेहनतीची तयारी ठेवण्याचा संदेश दिला. दहावीनंतर करिअरची निवड कशी करावी, यावर सतीश पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी राकेश गोसावी यांचीही मंचावर उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात ना. के. फडके यांनी गुरूच्या महत्त्वावर भाष्य करीत विद्यार्थ्यांना गुरूचा आदर राखण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा गायकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय दिलीप साळुंखे यांनी करून दिला. आभारप्रदर्शन हर्षदा सोनवणे यांनी केले आणि शेवटी कपिल लिये यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
.................
श्रमजीवीच्या तालुका अध्यक्षपदी सुदेव वाघे
टिटवाळा (वार्ताहर) : श्रमजीवी संघटनेच्या कल्याण तालुक्याच्या अध्यक्षपदी वासुदेव वाघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व राज्याध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. म्हसकल येथील कातकरी समाजातील वाघे यांचा प्रवास संघर्षमय पण प्रेरणादायी ठरला आहे. आर्थिक अडचणींच्या सावटाखालीही त्यांनी शिक्षण सोडले नाही. रायता हायस्कूलमधून बारावी आणि नंतर पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. २०१०मध्ये ते संघटनेशी जोडले गेले. कातकरी घटक प्रमुख म्हणून पाच वर्षे आणि तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणून सहा महिन्यांच्या अनुभवाच्या जोरावर आता त्यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ही जबाबदारी केवळ सन्मान नाही, तर संघटनेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. तसेच संघटनेचे काम अधिक जोमाने आणि इमानेइतबारे पार पाडेन, अशी भावना वाघे यांनी या वेळी व्यक्त केली. कार्यक्रमात विवेक पंडित यांनी वाघे यांचे अभिनंदन केले. वासुदेव वाघे यांचे नेतृत्व संघटनेला अधिक बळकट करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संघटनेच्या सामाजिक लढ्यांतून घडलेलं हे नेतृत्व आता नव्या उंचीवर पोहोचले असून, आगामी काळात त्यांच्या कार्यातून समाजाला सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
................

Marathi News Esakal
www.esakal.com