पावणेदोन लाख करदात्यांना करसवलतीचा लाभ
भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेच्या करसवलतीचा लाभ तब्बल एक लाख ७७ हजार करदात्यांनी घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत अवघ्या तीन महिन्यांत मालमत्ता कराचे तब्बल ११३ कोटी रुपये जमा झाले आहेत. करदेयके मिळाल्यानंतर ३० जूनपर्यंत कर भरल्यास मूळ करात महापालिकेने पाच टक्के सवलत देऊ केली होती.
महापालिकेकडून एप्रिलमध्ये करदेयके वाटप झाल्यानंतर करदाते तो वर्षाअखेरीस भरत असतात. काही प्रामाणिक करदातेच कराचा भरणा पहिल्या दोन ते तीन महिन्यांत भरतात. जास्तीत जास्त नागरिकांनी कर लवकरात लवकर भरावा, यासाठी महापालिकेने गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही करसवलत जाहीर केली आहे. त्यानुसार ३० जूनपर्यंत कर भरणाऱ्यांना मूळ करात पाच टक्के व ३१ जुलैपर्यंत तीन टक्के सवलत देण्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. पाच टक्के सवलतीची मुदत काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आली. या वेळेत एक लाख ७७ हजार ४४८ करदात्यांनी ११३ कोटी ५५ लाख २४ हजारांचा कर भरला. त्यात ९७,९८४ करदात्यांनी ६३ कोटी ६६ लाखांचा कर ऑनलाइन व ७९,४६४ करदात्यांनी ४९ कोटी ८९ लाखांचा कर ऑफलाइन म्हणजेच धनादेश अथवा रोखीने भरला. मिरा-भाईंदरमध्ये सुमारे साडेतीन लाख करदाते आहेत. त्यात निवासी व व्यावसायिक करदात्यांचा समावेश आहे.
गतवर्षी पहिल्या तीन महिन्यांत ११७ कोटींची वसुली झाली होती. त्या तुलनेत यावर्षीची करवसुली काही प्रमाणात कमी झाली आहे. करवसुलीवर शहरातील विकासकामे अवलंबून असतात. सध्या महापालिकेकडे निधीची कमतरता असल्याने अनेक विकासकामे ठप्प होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी कराचा भरणा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.