खडतर पायवाटेने आदिवासींचा प्रवास

खडतर पायवाटेने आदिवासींचा प्रवास

Published on

भयाण वास्तव

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. १३ : सरकारने शहापूर तालुक्यात विविध रस्ते, प्रकल्प साकारले आहेत; मात्र वाड्या-वस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. रस्तेच नसल्याने तालुक्यातील वाड्या-वस्त्या विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्या आहेत. परिणामी, या वस्त्यांमध्ये आरोग्याच्या, शैक्षणिक आणि विजेच्या सुविधा पोहचू शकलेल्या नाहीत. चिखल, मातीच्या, दगड-गोट्यांच्या पायवाटेशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. उन्हाळ्यात किमान चिखलाचा त्रास कमी होतो; परंतु पावसाळ्यात दगड, गोटे, चिखल आणि चढ-उताराच्या गवताळ पायवाटेने पोहचणे म्हणजे मोठे जिकिरीचे मानले जात आहे.
अनेक वर्षांपासून तालुक्यातील नागरिक रस्त्यांची मागणी करत आहेत. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींमधील ६८ वाड्या-वस्त्या रस्त्यांपासून वंचित आहेत. रस्ते नसल्याने वाहने थेट वस्तीत पोहचत नाही. अशातच गर्भवती महिला आणि अत्यवस्थ रुग्णांना दिवसा अथवा रात्री रुग्णालयात उपचारांसाठी न्यायचे झाल्यास चादरीच्या डोलीचा वापर करूनच खडतर पायवाटेने जावे लागते. अनेकदा अर्ध्या वाटेतच रुग्णांना जीव गमावण्याच्या घटना घडल्या आहेत. गर्भवती महिलाही वेळीच वैद्यकीय उपचार न मिळाल्याने वाटेतच प्रसूती होण्याच्या घटना घडल्या आहेत. सर्पदंशाचे रुग्णही वेळीच रुग्णालयात पोहचता न आल्याने दगावल्याच्या घटना घडत आहेत.
अनेक वाड्या-वस्त्यांच्या गवताळ, खडतर वायवाटेत ओढा अथवा नाला येत असतो. या ओढे आणि नाल्यांना सध्या पावसामुळे पूर आला आहे. अशा परिस्थितीत पलिकडे जाण्यासाठी खोल ओढा ओलांडून रहिवासी जात आहेत. आदिवासींच्या उन्नती आणि उत्थानाचा विडा उचललेला सरकारचा आदिवासी विकास विभाग या प्रश्नावर कागदी सोपस्कार करण्यापलीकडे प्रत्यक्षातील उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे जिल्हा परिषदेनेही तालुक्यातील रस्ते नसलेल्या वाड्या-वस्त्यांकडे पाठ फिरवली आहे. या पायवाटांचे रस्त्यांमध्ये रूपांतर कधी होणार, याची प्रतीक्षा आदिवासी पिढ्यानपिढ्या करत आहेत.

वरवर विकासाचे आभासी चित्र
शहापूर तालुक्यातून एकीकडे शीघ्रगतीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, तर दुसरीकडे मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. प्रस्तावित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पही याच तालुक्यातून जाणार आहे. ॲन्यूटी हॅब्रीड योजनेतून मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणारा शहापूर-खोपोली राष्ट्रीय महामार्गही येथून गेला आहे. यामुळे रस्ते आणि त्यांवरील पूल बांधण्यासाठी हजारो कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. या आकडेवारीमुळे शहापूर तालुक्याचा वरवर विकास झाल्याचे आभासी चित्र आहे.


तालुक्यातील या ६८ वाड्या-वस्त्यांच्या वाटा खडतर
• कळंबे, बोरशेती ग्रामपंचायत हद्यीतील देवीचापाडा, लोभीपाडा, पोढ्याचापाडा
• मोखावणे ग्रामपंचायतीमधील पाटीलवाडी, वारलीपाडा
• ढाकणे ग्रामपंचायतीमधील कातकरीवाडी
• मोहिली ग्रामपंचायतमधील माळीपाडा, वाघीवली, माळीपाडा ते टहारपूर
• पिवळी ग्रामपंचायतमधील गुरुडेपाडा, हेदूपाडा, जांभूळपाडा, नळाचीवाडी
• वांद्रे ग्रामपंचायतमधील आलनपाडा, दोडकेपाडा, भवरपाडा
• खराडे ग्रामपंचायतमधील कातकरीवाडी
• अजनूप ग्रामपंचायतमधील कोळीपाडा, सावरकूट
• आटगांव ग्रामपंचायतमधील तळ्याची वाडी
• वेहळोली (बु.) ग्रामपंचायतमधील कातकरी वस्ती, फर्जनवाडी
• उंब्रई ग्रामपंचायतमधील कातकरीवस्ती
• गुंडे व डेहणे ग्रामपंचायतमधील कोठावाडी, भितारवाडी
• नडगांव (सो.) ग्रामपंचायतमधील चाफेवाडी
• शेई ग्रामपंचायतमधील साखरवाडी
• शेरे ग्रामपंचायतमधील पाटीचा माळ
• अल्याणी ग्रामपंचायतमधील कृष्णाची वाडी
• नेहरोली ग्रामपंचायतमधील सोनारशेत, तईचीवाडी
• आसनगाव ग्रामपंचायतमधील दत्तगुरुनगर
• आवळे ग्रामपंचायतमधील आंबेडोह, वाडुचापाडा
• खातिवली ग्रामपंचायतमधील वारलीपाडा, चौकीपाडा
• वासिंद ग्रामपंचायतमधील जांभूळपाडा
• साकडबाव ग्रामपंचायतमधील तळ्याचीवाडी
• कोठारे ग्रामपंचायतमधील वेटा
• वेळूक ग्रामपंचायतमधील पटकीचा पाडा, तरीचा पाडा
• वेहलोंढे ग्रामपंचायतमधील सापटे पाडा, जाधवपाडा, नासिक पाचकुडवे पाडा
• अघई ग्रामपंचायतमधील ठाकूरपाडा, भोयेपाडा
• फुगाळे ग्रामपंचायतमधील वरसवाडी
• आदिवली ग्रामपंचायतमधील पायरवाडी
• टेंभे ग्रामपंचायतमधील आंबिवलीवाडी, कातकरीवस्ती
• वरस्कोळ ग्रामपंचायतमधील कातकरीवाडी
• वेहळोली ग्रामपंचायतमधील कृष्णाची वाडी ते भावार्थेपाडा, देवाळवाडी
• शिरवंजे ग्रामपंचायतमधील वाचकोले कातकरीवाडी
• कानडी ग्रामपंचायतमधील वेहळोली कातकरीवाडी
• भावसे ग्रामपंचायतमधील भुसारेपाडा, पाटीलवाडी
• काजळविहीर पाषाणे ग्रामपंचायतमधील पाषाणेवाडी
• शिरोळ ग्रामपंचायतमधील विहिरीचा पाडा, नाग्या कातकरीवाडी
• दळखन ग्रामपंचायतमधील विंचूपाडा, कातकरीवाडी
• मुगांव ग्रामपंचायतमधील पालेपाडा
• साठगाव ग्रामपंचायतमधील कातकरीवाडी
• वाशाळा ग्रामपंचायतमधील सखारामपाडा
•आवरे ग्रामपंचायतमधील जांभूळपाडा
• टहारपूर व मोहिली ग्रामपंचायतमधील नेवरे ते टहारपूर जोडरस्ता, वावेघर

शहापूर तालुक्यातील वाड्या-वस्त्यांच्या रस्त्याची समस्या कायमची सुटावी यासाठी २०२२पासून प्रशासकीय कार्यालयात पाठपुरावा करत आहोत. प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. या प्रश्नासाठी मोठे आंदोलन करणार आहोत.
- प्रकाश खोडका, तालुका सचिव, श्रमजीवी संघटना

मोर्चे आणि आंदोलनांमधून अनेकदा दुर्लक्षित रस्त्याच्या प्रश्नाने त्रस्त वाड्या-वस्त्यांच्या समस्या मांडल्या. परंतु प्रशासन दाद घ्यायला तयार नाही. या प्रश्नासाठी मोठे आंदोलन हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही.
- राजेंद्र म्हसकर, पदाधिकारी श्रमजीवी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com