एमआयडीसीला पालापाचोळ्याचा वेढा

एमआयडीसीला पालापाचोळ्याचा वेढा

Published on

एमआयडीसीला पालापाचोळ्याचा वेढा
ओला कचरा सडल्याने परिसरात दुर्गंधी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : कल्याण-डोंबिवली शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन चेन्नई पॅटर्न शहरात राबवित आहे; मात्र तरीही डोंबिवलीत अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची स्थिती सुधारली; मात्र या रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचा वेढा पडला आहे. कचरा कुजून त्याला कुजलेला वास येत आहे. दररोज हा कचरा उचलला जात नसल्याची बाब समोर आली आहे.

प्रदूषण, गटारांची अर्धवट कामे, सोसायट्यांच्या आवारात पाण्याची डबकी यानंतर आता एमआयडीसीला पालापाचोळ्याच्या कचऱ्याने वेढलेले दिसून येत आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या झाडांमुळे होणारा पालापाचोळा उचलला जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाकडून सुका कचरा आठवड्यातून दोन दिवसांत उचलला जातो. पालापाचोळ्याचा कचरा सुक्या कचऱ्यामध्ये गणला जातो. तोदेखील आठवड्यातून दोनदा उचलला जातो; मात्र तो रस्त्याच्या कडेला जमा करून ठेवण्यात येतो. हा कचरा सडल्याने दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढते. यामुळे येथील नागरिकांना या दुर्गंधीचा कायम सामना करावा लागतो.

काही रस्त्यांवर कडेला गाड्या पार्क केलेल्या असल्याने त्या ठिकाणचा झाडांचा कचरा हा गोळा केला जात नाही. तो कचरा ओला झाल्याने रस्त्याला फूटपाथला चिटकून बसतो. त्यामुळे तो झाडला जात नाही. परिणामी माती, पालापाचोळा यांचा चिखल होऊन घाण साचलेली दिसून येते. यामुळे या भागातील कचरा एक दिवसा आड उचलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी येथील नागरिक घनकचरा विभागाकडे करत आहेत.

ई प्रभाग अंतर्गत हा भाग असून, या भागातील सुका कचरा हा आठवड्यातील दोन दिवस म्हणजे बुधवार व रविवारी गोळा केला जातो. जेसीबी व डम्परच्या सहाय्याने हा कचरा उचलला जातो. रस्त्यावरील झाडांसोबतच या भागातील सोसायटी, बंगले यातील झाडांची छाटणी तसेच पानगळीचे दिवस या दिवसांत मोठ्या प्रमाणात हरित कचरा निघतो. एमआयडीसी निवासी भागात दररोज ओला कचरा हा ६० टनापर्यंत जमा होतो, तर बुधवार व रविवारी दोन मोठ्या आरसी गाड्या व १२ घंटागाड्यांच्या सहाय्याने सुका कचरा गोळा केला जातो. बुधवारी सुका कचरा हा आठ ते नऊ टनाच्या आसपास जमा होतो, तर रविवारी सहा ते सात टनाच्या आसपास कचरा जमा होतो.

मनुष्यबळाची कमतरता
एमआयडीसी निवासी भाग हा झाडाझुडपांनी वेढलेला आहे. यामुळे ग्रीन वेस्ट तयार होण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. आठवड्यातून दोनदा हा कचरा उचलला जातो, परंतु एरव्ही रस्ता झाडल्यानंतर तो तसाच रस्त्याच्या कडेला पडलेला असतो. उन्हाळा, पावसाळ्यात या कचऱ्याचे विघटन होण्याची प्रक्रिया ही जलद असल्याने त्याला दुर्गंधी येते व डासांचे प्रमाणदेखील वाढते. कल्याण-डोंबिवलीत ई प्रभागातील एमआयडीसी निवासी विभागात हरित कचरा सर्वात जास्त निघत असेल. मिलापनगर भागातील तीन रस्त्यांवरच चार डम्पर या कचऱ्याने भरले जातात. मनुष्यबळाची कमतरता, अपुरे साधन व आठवड्यातील दोन दिवस सुका कचरा उचलण्याचे असल्याने ही परिस्थिती निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com