उपोषणाच्या इशाऱ्यानंतर पालिकेची धावपळ
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर पालिकेची धावपळ
सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी दिला होता इशारा
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : पालिकेकडून नागरिकांना विविध प्रकारच्या सार्वजनिक नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक इमारतींची बांधणी करण्यात आली. दरम्यान, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरी सोयी-सुविधा दिल्या गेल्या नसून, त्या धूळखात पडल्या आहेत. तिथे नागरी सुविधा सुरू कराव्यात म्हणून सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी पालिकेला निवेदन दिले. सोयी-सुविधा सुरू करा नाहीतर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला होता. या अनुषंगाने मालमत्ता विभागाने नागरी सुविधा इमारती त्या त्या विभागाकडे वर्ग केल्या आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पालिकेने सानपाडासहित इतर ठिकाणी सार्वजनिक नागरी सुविधा मिळण्यासाठी इमारतींची बांधणी केली आहे. त्यातील सानपाडा सेक्टर चार येथील दैनंदिन बाजार संकुल, पाच येथील व्यायामशाळा, जुईनगर येथील प्राण्यांचे रुग्णालय, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन इत्यादी इमारती कोट्यवधी रुपये खर्चूनदेखील आजच्या घडीला धूळखात पडून आहेत. त्या नागरिकांसाठी खुले कराव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी पालिकेला ४ जून रोजी इशारा पत्र देऊन १५ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने पालिका मालमत्ता विभागाने सोमवारी (ता. ७) एक पत्र काढून सार्वजनिक इमारती वर्ग केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आता तेथील विभागाने सुविधा देण्याची गरज आहे. मंगळवारपर्यंत (ता. १५) धूळखात पडलेल्या इमारतींमध्ये सुविधा दिल्या नाहीत तर बेमुदत उपोषण अटळ असल्याचे कचरेंनी सांगितले आहे.
मंत्रालय दरबारी पत्रव्यवहार
धूळखात पडलेल्या इमारतींमध्ये तत्काळ नागरी सुविधा सुरू कराव्यात, यासाठी नीलेश कचरे यांनी पहिले मनपा अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार केला. त्यामध्ये यश आले नाही म्हणून मंत्रालय दरबारी पत्रव्यवहार केला, परंतु तिथेही अपयशाला सामोरे जावे लागले होते.
ज्या विभागाशी नागरी सेवा-सुविधा इमारती संबंधित आहेत त्यांच्याकडे त्या वर्ग केल्या आहेत. त्या अनुषंगाने ते विभाग कार्यवाही करतील.
- भागवत डोईफोडे, उपआयुक्त, मालमत्ता, पालिका
मागील अनेक वर्षांपासून फक्त आश्वासने मिळतात, परंतु कार्यवाही होत नाही. त्यामुळे पालिकेने १५ जुलैपर्यंत सर्व ठिकाणी सोयीसुविधा पूर्ण द्याव्यात नाहीतर जुईनगर येथील तुर्भे विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल.
- नीलेश कचरे, उपोषणकर्ते, नवी मुंबई