कोपरखैरणे स्थानकात पाणीपुरवठ्यात अडचणी
कोपरखैरणे स्थानकात पाणीपुरवठ्यात अडचणी
प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांची गैरसोय; सिडकोकडे तक्रार करूनही समस्या जैसे थे
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : ट्रान्स हार्बर मार्गावरील महत्त्वाच्या कोपरखैरणे रेल्वेस्थानकातील सुविधांअभावी प्रवाशांना दररोज अडथळ्यांचा सामना करावा लागतो. हे स्थानक पूर्वेकडील औद्योगिक पट्टा आणि पश्चिमेकडील लोकवस्तीतील नागरिकांसाठी प्रवासाचे केंद्रबिंदू आहे. दररोज हजारो प्रवाशांची गर्दी असूनही स्थानकात मूलभूत सुविधा तोकड्या आहेत. स्थानकातील मुख्य समस्या म्हणजे पाणीपुरवठ्याचा अभाव. सिडकोकडून अद्याप कोणतेच स्थानक रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित न केल्याने स्थानकातील विविध समस्यांसाठी रेल्वे प्रशासनाला वारंवार सिडकोकडे तक्रारी कराव्या लागतात. तक्रारीनंतर समस्या ‘जैसे थे’ पाहायला मिळतात.
काही दिवसांपासून कोपरखैरणे स्थानकातील नळाचे पाणीच बंद आहे. त्यामुळे नाइलाजास्तव शौचालयाचा वापर रेल्वे कर्मचारी अधिकारी व प्रवासीवर्गाला करता येत नाही. स्थानकाच्या दोन्ही बाजूला महापालिकेचे सुलभ शौचालयदेखील नसल्याने रेल्वे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवासीवर्गाची कुचंबणा होते. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा बहुतांश वेळा कमी दाबाने असतो. त्यामुळे रेल्वेस्थानकातील पाणी साठवणूक करणाऱ्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. या ठिकाणी असलेली बोअरवेलही खराब झाली आहे. त्यामुळे स्थानकातील पाणपोई कोरड्या पडल्या आहेत. पाणी नसल्याने शौचालय कुलूप बंद ठेवण्यात आले आहे. पाण्याचा फटका जसा रेल्वे प्रवाशांना बसत आहे, तसाच रेल्वे कर्मचारीवर्गालाही बसतो.
रेल्वेस्थानकालगत असलेल्या जागेवर बेघरांनी बस्तान मांडले आहे. पदपथावर अनेकांनी आपला संसार थाटला आहे. एकीकडे नवी मुंबई महापालिका शहरात विशेषतः रेल्वेलगतच्या भिंतींना रंगरंगोटी करतेय, तर दुसरीकडे बेघरांमुळे, उघड्यावर पसरलेले सामान, कपड्यांमुळे परिसर बकाल वाटतो.
स्थानकाचा दैनंदिन आढावा
प्रवासीसंख्या ः४१ हजार
तिकीटविक्री ः १० हजार
उत्पन्न ः ३ लाख
प्रवाशांना उद्भवणाऱ्या समस्या
फलाट क्रमांक चारवरील गळके छत
पाणपोई आहेत पण नळ गायब
स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा उच्छाद
बेशिस्त रिक्षाचालकांची गर्दी
स्थानकातील जिन्यातील पायऱ्या तुटलेल्या
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
कचऱ्यासाठी असणारे लिटिल बीन्स गायब, फक्त सांगाडे शिल्लक
स्थानकातील भिंतीवर गुटख्याच्या पिचकाऱ्या
रात्रीच्या वेळी मद्यपी, गर्दुल्ल्यांचा वावर
रोज कोपरखैरणे ते बदलापूर असा प्रवास करावा लागतो. स्थानकातील छत गळके आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केल्यास ते सिडकोकडे बोट दाखवतात. मग कोणाकडे तक्रार करायची.
- रवींद्र जस्वाल, प्रवासी
संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर काही संशयास्पद आणि उपद्रवी टोळक्यांचा वावर वाढतो. सुरक्षा व्यवस्थेचाही अभाव असल्याने महिला प्रवाशांना याचा विशेष त्रास होतो.
- रोहिदास पिंगळे, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.