नवी मुंबई महापालिकेत बाहेरचा शहर अभियंता?

नवी मुंबई महापालिकेत बाहेरचा शहर अभियंता?

Published on

नवी मुंबई महापालिकेत बाहेरचा शहर अभियंता?
प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या गर्दीने स्थानिक अधिकाऱ्यांवर अन्याय
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : कोविडनंतर नवी मुंबई महापालिकेवर आलेल्या प्रशासकाच्या राजवटीच्या काळात प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची भाऊगर्दी झाली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन महत्त्वाचे पद देण्याऐवजी बाहेरून अधिकारी आणण्याची प्रथा पडली आहे. विद्यमान शहर अभियंते शिरीष आरदवाड यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्या स्वीय सहाय्यक पदावर वर्णी लागली आहे. आरदवाड यांच्या बदलीमुळे त्यांच्या जागेवर सेवाज्येष्ठतेनुसार अतिरिक्त शहर अभियंते अरविंद शिंदे यांची नियुक्ती होणे अनिवार्य होते; मात्र स्थानिक अधिकाऱ्यांना डावलून बाहेरून अधिकारी आणण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

नवी मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने अधिकारी वर्गच निर्णय घेत आहेत. त्यातच महापालिकेत एकूण ११ उपायुक्तांपैकी सहा महापालिका आस्थापनेवरील आणि पाच प्रतिनियुक्तीवरील असायला हवेत; मात्र यामध्ये तीन महापालिका आस्थापनेवरील आणि दहा उपायुक्त प्रतिनियुक्तीवरून आलेले अधिकारी आहेत. दुसरीकडे सहाय्यक आयुक्तांची संख्या २२ इतकी हवी आहे. प्रत्यक्षात ११ अधिकारी हे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यापैकी नऊ अधिकारी हे प्रतिनियुक्तीवरील आलेले सहाय्यक आयुक्त झाले आहेत. तर महापालिका सेवेतील चार अधिकाऱ्यांना सहाय्यक आयुक्तपद देण्यात आले आहे. त्यातच आता शहर अभियंत्यासारखे महत्त्वाचे पददेखील महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांमधून भरण्याऐवजी बाहेरून अधिकारी आणण्याचा प्रयत्न काही राजकीय नेतेमंडळींकडून सुरू असल्याची चर्चा रंगल्या आहेत.


प्रयोग फसला
नवी मुंबई महापालिकेत याआधीदेखील बाहेरून अधिकारी आणून मुख्य पदांची जबाबदारी देण्याचा प्रयोग झाला आहे. आरोग्य विभागात मुख्य आरोग्य अधिकारी पदावर डॉ. बाळासाहेब सोनवणे आणि डॉ. प्रमोद पाटील हे दोन अधिकारी प्रतिनियुक्तीवर आणण्याचा अनुभव आहे; मात्र त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेत फारसा फरक पडला नाही.


स्थानिक अधिकाऱ्यांवर अन्याय
नवी मुंबई महापालिकेवर आलेल्या ज्यादा प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांमुळे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत आहे. महापालिकेत कार्यरत असलेल्या पदोन्नती समिती आणि निलंबन आढावा समिती अशा दोन्ही समितीवर सर्व प्रतिनियुक्तीवर अधिकारी आहेत. या समितीमध्ये महापालिका सेवेतील स्थानिक अधिकाऱ्याचा समावेश केलेला नाही. ज्या बाबी महापालिकेच्या हिताच्या आहेत. त्याची जाण प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांपेक्षा स्थानिक अधिकाऱ्यांना जास्त असते, असे महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी सांगितले.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com