अमेरिकन आंतरराष्ट्रीय गुणवत्ता सुधारणा पुरस्काराने एमजीएम हॉस्पिटल चा गौरव
आंतरराष्ट्रीय पुरस्काराने एमजीएम हॉस्पिटलचा गौरव
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : अमेरिकन हार्ट असोसिएशनमार्फत दिला जाणारा आंतरराष्ट्रीय गुणवत्ता सुधारणा पुरस्कार यंदा कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलला मिळाला आहे. देशातील केवळ चार रुग्णालयांना हा सन्मान मिळाला असून, त्यामध्ये एमजीएमचा समावेश होणे ही नवी मुंबईकरांसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. रविवारी (ता. १२) एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे कार्यक्रमात हा पुरस्कार डॉ. सुधीर कदम यांनी स्वीकारला.
एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने हा पुरस्कार मिळवून भारतासाठी गौरवाची कामगिरी केली आहे. या प्रतिष्ठित रुग्णालयाला अमेरिकन हार्ट असोसिएशन-आंतरराष्ट्रीय गुणवत्ता सुधारणा २०२५ प्रमाणन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. एस्टर एमआयएमएस कलकत्ता रमैया मेडिकल कॉलेज - बंगळुरू, अपोलो हॉस्पिटल्स-हैदराबाद आणि एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल-नवी मुंबई या देशातील केवळ चार रुग्णालयांना हा सन्मान मिळाला असून, त्यामध्ये एमजीएमचा समावेश होणे ही गौरवास्पद बाब आहे. एमजीएम रुग्णालयाला हा पुरस्कार उच्च-गुणवत्तेच्या, प्रोटोकॉलआधारित आणि रुग्णकेंद्री उपचार सेवा सातत्याने देण्याच्या वचनबद्धतेसाठी देण्यात आला आहे. हृदयविकार आणि स्ट्रोकसारख्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये तातडीने आणि प्रणालीबद्ध उपचार देण्यात यश संपादन केले आहे. एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. सुधीर कदम यांनी सांगितले, की हा पुरस्कार आमच्या संपूर्ण वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे. आमचा उद्देश रुग्णांना केवळ उपचारच नव्हे, तर जागतिक दर्जाची सेवा देणे आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे एमजीएम हॉस्पिटलची ख्याती केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ झाली आहे. यामुळे भविष्यातील वैद्यकीय सेवा आणि संशोधनासाठी नव्या संधींचा मार्गही खुला झाला आहे. या कार्यक्रमात एएचएच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व जागतिक प्रमाणन विभागाच्या उपाध्यक्षा पूजा पटेल, आंतरराष्ट्रीय संचालक जोश ओनिया तसेच दक्षिण आशियातील संचालक डॉ. सचिन मेनन, आरोग्य सेवा संचालक, महाराष्ट्र, डॉ. नितीन अंबाडेकर, एमजीएम रुग्णालयाचे ट्रस्टी व वैद्यकीय संचालक, डॉ. एस. एन. कदम, डॉ. गणेश आर. नायर (माता व बाल संगोपन अधिकारी पनवेल महापालिका) आणि इतर मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.