रेशन दुकानदार आर्थिक संकटात

रेशन दुकानदार आर्थिक संकटात

Published on

किन्हवली, ता. १४ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे सहा महिन्यांपासून लाखो रुपयांचे अनुदान थकीत असल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
शहापूर तालुक्यात एकूण १७२ स्वस्त धान्य दुकाने आहेत. काही दुकाने सहकारी संस्था आणि महिला बचत गट यांनाही जोडली आहेत. जे सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून नागरिकांना रास्त दरात धान्य पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. रेशन दुकानदारांना प्रति किलो शिधामागे १ रुपये ५० पैसे इतके कमिशन मिळते. शहापूर तालुक्यातील साधारणपणे १२० दुकानदारांना फेब्रुवारीपर्यंतची रक्कम अदा झाली आहे. उर्वरीत ५१ दुकानदार आणि फेब्रुवारीनंतर सलग सर्वच दुकानदारांना सहा महिने कमिशन न मिळाल्याने या सर्व दुकानदारांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. घरखर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, दुकानाचे भाडे, वीजबिल आणि इतर दैनंदिन खर्च भागवणे दुकानदारांना कठीण झाले आहे. प्रत्येक दुकानदार बँकेत जाऊन कमिशन आल्याची चौकशी करतात; मात्र खात्यावर रक्कम आली नसल्याचे कळताच ते निराश होऊन माघारी येतात.
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईझ शॉपकीपर्स फेडरेशन पुणे या संघटनेने वित्तीय सल्लागार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई, प्रधान सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण कक्ष, मंत्रालय मुंबई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच अंमलबजावणी होत नसल्याने रास्त भाव धान्य दुकानदाराचा आर्थिक कणा मोडला आहे

संभ्रम आणि चिंता
शहापूर तालुका पुरवठा विभाग व जिल्हा पुरवठा विभागानेही दुकानदारांच्या मागणीची दखल घेऊन कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. सरकारच्या धोरणात्मक बदलांमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे कमिशन अडकल्याचे बोलले जात असल्याने दुकानदारांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण आहे.

अडचणींचा डोंगर
अलीकडे सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केली असून, त्या प्रक्रियेमध्येही मोठ्या अडचणी येत आहेत. इंटरनेट प्रणालीमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने ई-पॉस मशीन ठप्प होऊन लाभार्थ्यांना धान्य वाटप करतानाही अनंत अडचणी येतात. अनेकदा दुकानदार व ग्राहकांमध्ये वादही निर्माण होतात.

थकीत कमिशन मिळण्यासाठी संघटनेने आतापर्यंत अनेकदा मागणी केली आहे. यात बचत गटांना जोडलेल्या दुकानांना प्रथम प्राधान्य द्यावे असे सांगितले आहे. राज्यातील सर्वच मार्जिन वाढ करण्यात मागणी आहे.
- विवेक भेरे, सचिव, ठाणे जिल्हा ऑल महाराष्ट्र फेअर प्राईझ शॉपकीपर्स फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com