संतापाची धग उतरली ‘रस्त्यावर’
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : खड्ड्यांनी भरलेले रस्ते, खांद्यावर चढणारी धूळ, पाठदुखीने विव्हळणारे नागरिक आणि या साऱ्या दयनीय स्थितीवर मौन धारण केलेली शासकीय यंत्रणा. अखेर या संतापाची धग रस्त्यावर उतरली आणि आमदारांविरोधातील घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रस्त्यांची दुर्दशा आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात रविवारी नागरिकांचा उद्रेक झाला होता. या वेळी अनेकांनी स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा निर्धार केला.
उल्हासनगर शहरातील मधुबन चौक ते चोपडा कोर्ट आणि पुढे आमदार कार्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण आणि सातत्याने होणारे अपघात यामुळे वैतागलेल्या नागरिकांचा अखेर संयम सुटला. रविवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत ‘शरम करा कुमार आयलानी, शरम करा!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते पंकज त्रिलोकानी यांनी केले. प्रशासनाच्या दुर्लक्षावर रोष व्यक्त करत त्यांनी आपल्या वैयक्तिक खर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा निर्धार केला आणि प्रत्यक्ष कामही सुरू केले. त्यांच्या या कृतीला नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभला आणि अनेकांनी पुढाकार घेत रस्त्याचे खड्डे बुजवण्याच्या कामात सहभाग घेतला.
रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की दररोज दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहेत. वाहनांचे नुकसान तर होतच आहे; पण अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी यांसारख्या आरोग्यविषयक त्रासांनीही ग्रासले आहे. इतक्या महत्त्वाच्या रस्त्यावरच जर ही परिस्थिती असेल, तर इतर भागांतील रस्त्यांचे हाल किती भीषण असतील, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
उपरोधाने झंडू बामचे वाटप
या आंदोलनात एका नागरिकाने उपरोधाने झंडू बाम वाटून आमदारांवर उपहासात्मक टीका केली. "आमदार काही करत नाहीत, त्यामुळे झंडू बामनेच आराम मिळावा अशी आशा आहे, असे सांगत त्यांनी संतापातही एक वेगळी विनोदी छटा आणली. या कृतीने उपस्थितांमध्ये एक क्षणासाठी हशा पिकवला.
महापालिकेवरही ताशेरे
महापालिका फक्त कर गोळा करण्यात मग्न आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे ती पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, असा रोष नागरिकांनी व्यक्त केला. रस्ते सुधारा, अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशाराही उपस्थित नागरिकांनी दिला.
शहरातील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत घेण्यासारखे झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघात, दुखापती आणि नागरिकांचा त्रास वाढतोय; पण आमदार आणि प्रशासन केवळ आश्वासनांच्या पलिकडे काही करत नाहीत. म्हणूनच आम्ही रस्ते सुधारण्याची सुरुवात केली आहे. ही लढाई फक्त खड्ड्यांविरोधात नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आहे.
- पंकज त्रिलोकानी, सामाजिक कार्यकर्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.