कल्याण अवती-भवती
डोंबिवलीत मोफत वह्यावाटप
डोंबिवली (बातमीदार) : आजदे पाडा येथील मातोश्री विद्यामंदिर व रजनीकांत माध्यमिक विद्यालयात आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. तसेच कल्याण तालुका शिवसेनाप्रमुख महेश पाटील, विधानसभा संघटक बंडू पाटील, विनय पाटील, प्रीतेश पाटील हे उपस्थित होते. आमदारांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका अर्चना घोलप यांनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष वर्षा जळगावकर, मातोश्री विद्यामंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, रजनीगंधा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उन्नती पतंगराव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
....................
मूलभूत समस्यांबाबत अधिकाऱ्यांना निवेदन
कल्याण (वार्ताहर) : वडवली अटाळी प्रभागातील मूलभूत समस्या मार्गी लावण्याबाबत महापालिकेचा विद्युत विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या शिष्टमंडळाने पत्र दिले. वडवली-अटाळी प्रभागातील गणेशनगर, मोतीरामनगर, आंबिवली स्टेशन परिसर, वडवली गाव, अटाळी गाव परिसरातील काही परिसरात पथदिवे बसविणे अत्यंत गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी परिसरातील नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना अंधाराचा सामना करावा लागत आहे. याबाबत कार्यकारी अभियंता विद्युत विभाग प्रशांत भागवत यांना पत्र देऊन पथदिव्यासारखी सुविधा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यासंदर्भात प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. वडवली-अटाळी प्रभागातील नाल्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले बांधावेत, अशी मागणी कार्यकारी अभियंता घनश्याम नवागुंळ यांना पत्र देत केली. त्यांनी अटाळी परिसरातील मुख्य नाल्याच्या बांधकामाबाबत प्रस्ताव तयार करणार येईल, असा सकारात्मक प्रतिसाद दिला. वडवली-अटाळी प्रभागात वारंवार कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत पत्र देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या वेळी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, युवासेना पदाधिकारी वैभव पाटील, अरविंद पाटील आदी उपस्थित होते.
..................
थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिर
कल्याण (वार्ताहर) : कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण व खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १३) रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गरजू थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान केले. थॅलेसेमिया हा एक गंभीर रक्तविकार आहे. या आजाराने ग्रस्त रुग्णांना नियमितपणे रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते. रविवारी झालेल्या शिबिरात सुमारे ५४ युनिट रक्तदान झाले. त्याचप्रमाणे १ जुलैला डॉक्टर दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म नं. १ येथेही शिबिर घेण्यात आले होते. त्यामुळे १५ दिवसांत सुमारे १२५ युनिट रक्त जमा झाले. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे प्रकल्प प्रमुख गौतम दिवाडकर, प्रफुल्ल क्षीरसागर, उपप्रमुख अनिल अग्रवाल, तेजस्विनी पाठक यांनी दोन्ही शिबिरांचे नियोजन केले होते. तसेच ही दोन्ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना, इनरव्हील क्लब ऑफ कल्याण, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स, रोटरॅक्ट क्लब ऑफ अचिवर्स कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ न्यू कल्याण यांची साथ मिळाली. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे नवनिर्वाचित अध्यक्ष धीरेंद्र सिंह तसेच खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेचे प्रमुख उमेश बोरगावकर यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
...................
सरकारी शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
टिटवाळा (वार्ताहार) : समाजातील अनेक घटक शिक्षण, आरोग्य आणि निवाऱ्याच्या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्यामुळे जनताहित फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारी शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, इंग्रजी भाषा कौशल्य आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी संगणक क्लासेस, जागतिक स्तरावरील संवादासाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क मार्गदर्शन वर्ग हे उपक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे. याचबरोबर गरीब, निराधार, विधवा, अपंग आणि भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी मालकी हक्काच्या घरांची योजनासुद्धा राबवली जाणार आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सिमेंटच्या जंगलांमध्ये पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत चालले आहेत. त्यामुळे अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जनताहित फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष रितेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या उपक्रमांतून समाजात पक्षी आणि निसर्ग संवर्धनाची जागृती केली जात आहे. जनताहित फाउंडेशनने शाळा, संस्था, सोसायट्या आणि विविध परिसंस्थांमध्ये जाऊन पक्षी रक्षणाची माहिती देते. जखमी पक्ष्यांवर उपचार करणे आणि नंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडणे हे कार्य हाती घेतले आहे. सामाजिक न्याय आणि पर्यावरण रक्षण या दोन्ही आघाड्यांवर कार्य करीत जनताहित फाउंडेशनने एक व्यापक परिवर्तन घडवण्याचा संकल्प घेतल्याची माहिती जनताहित फाउंडेशनचे सचिव नेयाज शेख यांनी दिली.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.