व्यसनामुळे उध्वस्त होणाऱ्या हजारो कुटुंबीया
‘दारूमुक्त खारघर ते व्यसनमुक्त समाज’ एकदिवसीय संमेलन
माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांची उपस्थिती
खारघर, ता. १४ (बातमीदार) : दारू, अमली पदार्थांच्या व्यसनामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. यासंदर्भात तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्न तुम्ही न्यायालयाला विचारला पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी म्हटले आहे. खारघर येथे आयोजित संमेलनात महिला आणि आदिवासी हक्क कार्यकर्त्या वसुधा सरदार, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचचे संयोजक अविनाश पाटील, मानस शास्त्र आणि स्किल प्रशिक्षक तेजल खेडकर, स्त्री मुक्ती केंद्राच्या पदाधिकारी प्रा. वृषाली मगदूम, संघर्ष समितीचे संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
संघर्ष समितीच्या वतीने खारघरमध्ये दारूमुक्त खारघर ते व्यसनमुक्त समाज या विषयावर रविवार (ता. १३) एकदिवसीय संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनात मार्गदर्शन करताना माजी न्यायमूर्तींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहे. या विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. राज्यकर्त्यांना मुलांची काळजी नाही, मात्र आपल्याला आहे. हे त्यांना निक्षून सांगा, असा सल्लाही त्यांनी दिला. विशेष म्हणजे खारघरमध्ये जवळपास चाळीस शैक्षणिक संस्था आहे. या सर्व संस्था आणि विद्यार्थ्यांनी खारघर दारूबंदीचा ठराव करावा वाटत नाही, हे विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने महिलांच्या नावाने दारूचे परवाने दिले आहे, असे सांगून युवा पीढीने भारताचे संविधान वाचन करणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, या वेळी मानसशास्त्रज्ञ तेजल खेडेकर हिने दारूमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. देशात दरवर्षी ३० लाख, तर दिवसात दर १० सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे दारू, अमली पदार्थ अशा व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २३ ते ३९ वयोगटातील १३ टक्के व्यक्ती दारूच्या आहारी जात असल्याचे सांगितले. या वेळी वसुधा सरदार, अविनाश पाटील प्रा. वृषाली मगदूम यांनी आपले मत वक्त केले. या संमेलनात खारघर दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला. या वेळी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना, महिला युवक मंडळे आणि सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.