सहा दिवसांनी ट्रेनमध्ये हरवलेला भाऊ अखेर सापडला!

सहा दिवसांनी ट्रेनमध्ये हरवलेला भाऊ अखेर सापडला!

Published on

सहा दिवसांनी ट्रेनमध्ये हरवलेला भाऊ अखेर सापडला!
कर्जत रेल्वे पोलिसांची शोधमोहीम यशस्वी
कर्जत, ता. १४ (बातमीदार) ः गर्दीच्यावेळी गाडीमध्ये चुकामूक झालेला भाऊ अखेर सहा दिवसांनी मडगाव रेल्वेस्थानकात सापडला. हरवलेला हा युवक थोडा मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक होती, मात्र कर्जत रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या कार्यवाहीमुळे शोधमोहिमेला यश आले.
दिव्यांश सिंह (वय २०, रा. तळेगाव दाभाडे, पुणे) हा आपल्या मोठ्या भावासह पुण्याला जाण्यासाठी निघाला होता. कल्याण रेल्वेस्थानकात गर्दी असल्याने दोघे कर्जत येथे आले. येथे त्यांनी जोधपूर-हडपसर सुपरफास्ट एक्स्‍प्रेस पकडण्याचा निर्णय घेतला. फलाट क्रमांक एकवर सीएसएमटी बाजूकडील जनरल डब्यात दिव्यांश यांनी आपला मोठा भाऊ शिवांशु (वय २१) याला चढवले, मात्र गाडीत प्रचंड गर्दी असल्याने तो स्वतः मागील डब्यात चढला. लोणावळा स्थानक गाठल्यावर दिव्यांश यांनी आपल्या मोठ्या भावाला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर त्यांनी तत्काळ कर्जत रेल्वे पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. कर्जत पोलिसांनी तत्‍काळ तक्रार नोंदवून तपास सुरू केला. या तपासाची सूत्रे पोलिस हवालदार गोविंद कांबळे यांच्या हाती देण्यात आली. त्यांनी रेल्वे नेटवर्क, स्थानकांवरील आरपीएफ कार्यालये आणि विविध यंत्रणांच्या मदतीने शोध सुरू ठेवला. अखेर मडगाव रेल्वेस्थानकावर हरवलेला शिवांशु आढळून आला. तेथील आरपीएफकडून माहिती मिळताच कांबळे यांनी तत्काळ दिव्यांश यांना संपर्क साधला. दिव्यांश आणि पोलिसांचे पथक तातडीने मडगावला रवाना झाले. तेथे आरपीएफ अधिकाऱ्यांनी नातेवाईक असल्याची खात्री झाल्यानंतर हरवलेल्या शिवांशु याला त्यांच्या ताब्यात दिले. ८ जुलै रोजी तो सुखरूप सापडल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले. हरवलेला युवक मानसिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्याला दिशा किंवा परिस्थिती समजण्यास अडचण येत होती. त्यामुळे शोधप्रक्रिया अधिक जिकिरीची झाली होती, मात्र कर्जत रेल्वे पोलिसांची चिकाटी आणि तत्परता यामुळे शोधमोहिमेला यश आले.

Marathi News Esakal
www.esakal.com