थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

अंकिता संजय शेठ सीए परीक्षेत उत्तीर्ण
रोहा (बातमीदार) ः रोह्यातील बंगले आळी येथील रविवाशी संजय शेठ यांची कन्या अंकिता हिने इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्न्स ऑफ इंडिया (आयसीएआय) मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची समजली जाणारी चार्टर्ड अकाऊंटन्ट ( सीए) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. अंकिता हिने सातत्यपूर्ण परिश्रम, प्रबळ आत्मविश्वास आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे हे यश संपादन केले. तीच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवृंद तसेच रोहे शहरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केईएस मेहेंदळे हायस्कूलमध्ये १०वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अंकिता हिने जे. एम. राठी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ज्युनियर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील एस. पी. कॉलेजमध्ये बीबीए शिक्षण पूर्ण करून सीएच्या परीक्षेत देदीप्यमान यश मिळविले आहे. पुढे आर्थिक क्षेत्रात काम करीत समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचा वाटा उचलण्याचा संकल्प अंकित शेठ हिने केला आहे.
................
पांडुरंग घांग्रेकर स्मृती चषक स्‍पर्धेला प्रतिसाद
पेण (वार्ताहर) : दत्त अवधुत एंटरटेन्‍मेंट, स्वररंग पेण आणि दर्पण व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन कौशिकी हॉल, दत्तनगर, बोरगाव रोड, पेण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या गटामध्ये निकिता घाग आणि छोट्या गटात दुर्वा सुशांत झावरे यांनी विजेतेपद पटकावले आहे. तर दुसरा क्रमांक मनाली इंगळे, तृतीय चेतन पाटील, उत्तेजनार्थ केतन गवळी यांच्यासह छोट्या गटात दुसरा क्रमांक तपस्या पाटील, तृतीय आराध्य पाटील, उत्तेजनार्थ स्मंद मंदार कोठेकर यांनी बक्षिसे पटकावली असून, त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परीक्षकांच्या विशेष गटात प्रकाश पाटील, श्रुती नाईक, अर्णव शिंदे, विहान नाईक यांनाही बक्षिसे देण्यात आली. या वेळी दत्त अवधूत एंटरटेन्‍मेंटचे निर्माता कौस्तुभ विलास भिडे, शाल्मली भिडे, विलास भिडे, छाया भिडे, हर्षदा भिडे, स्वररंगचे उपाध्यक्ष सुनील पाटील, दिव्या घाडगे, कार्याध्यक्ष स्वप्नील साने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध विनोदी अभिनेते जयवंत भालेकर, दिगदर्शक व अभिनेता देवेंद्र सरदार, लेखिका दर्शन कुलकर्णी यांनी केले. या स्पर्धेसाठी पेण, रोहा, अलिबाग, मुंबई, डोंबिवली, पुणे, धुळे अशा ठिकाणांवरून स्पर्धकांनी भाग घेतला होता.
...................
महिलांसाठी पंच प्रशिक्षणासह परीक्षेचे आयोजन
पोयनाड (बातमीदार) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने लवकरच क्रिकेट पंच प्रशिक्षण व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा लेखी, तोंडी व प्रात्याक्षिके अशा स्वरूपात होणार आहे. महिलांना क्रिकेटमध्ये पंच म्हणून संधी मिळावी, यासाठी ही परीक्षा आयोजित केली जात आहे. या राज्यस्तरीय परीक्षेतून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्य पॅनेलवर पंचांची नियुक्ती होणार आहे. रायगड जिल्ह्यातील इच्छुक आजी, माजी महिला खेळाडू आणि क्रिकेटच्या जाणकारांनी स्पर्धेतील सहभागासाठी शुक्रवार, १८ जुलैपर्यंत https://forms.gle/NY7oBwvkobyT4ukKA या लिंकवर शुल्कासह नोंदणी करावी, असे आवाहन आरडीसीचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी केले आहे. परीक्षेपूर्वी ऑगस्ट महिन्यात आठ दिवसांच्या कालावधीत क्रिकेट लॉवर आधारित महिलांसाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने कोर्सचे आयोजन केले जाईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अथवा सप्टेंबरच्या सुरुवातीला लेखी, तोंडी व प्रात्याक्षिक स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे. या पंच परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आरडीसीएचे सहसचिव जयंत नाईक ९५६१०९९७३५, सदस्य ॲड. पंकज पंडित ८१४९२५२८२९, शंकर दळवी ९४२२५९४४१४१ यांच्याशी संपर्क साधावा.
.....................
सीएफआयतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पेण (बातमीदार) ः सीएफआयतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. दहावी, बारावीमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा चिल्ड्रन फ्युचर इंडियाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वैकुंठ पाटील भाजप उपाध्यक्ष व गटशिक्षणाधिकारी अरुणा मोरे आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सीएफआयतर्फे रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत केली जाते.
............
तळा भाजपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
तळा (बातमीदार) ः तळा तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी तालुक्यातील गुरूंना वंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राज्यसभा खासदार तथा रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त निगुडशेत येथील ह. भ. प. भागोजी सरफळे महाराज, श्रीस्वामी समर्थ मठाधिपती प्रमुख पिटसई सतीश पैठणकर, भजन मंडळाचे प्रमुख लक्ष्मण शिंदे, रायगड भूषण पुरस्कर्ते मारुती शिंदे, डॉ. सतीश वडके, पन्हेळी गाव प्रमुख लहू महाराज चोरगे, पन्हेळी समाजसेवक रमेश पाखड, पंच परमेश्वर मंदिर संस्थापक केशव सुतार, पांडुरंग मानकर यांचा सत्कार करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी बोलताना भाजप सरचिटणीस खेळू वाजे म्हणाले, की गुरुपौर्णिमा आपल्या जीवनात गुरूंच्या शाश्वत स्थानाची आठवण करून देते. जे आपल्याला नीतिमत्ता, कर्तव्य आणि भक्तीचा मार्ग दाखवतात. आज आपण एक मजबूत आणि आध्यात्मिकदृष्ट्या जागृत भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असताना, संत आणि विद्वानांचे मार्गदर्शन अधिक महत्त्वाचे बनते. या वेळी तळा तालुका भाजप अध्यक्ष रितेश मुंढे, सरचिटणीस खेळू वाजे, उपाध्यक्ष महादेव आर्डे, शहर युवक अध्यक्ष सुयोग बारटक्के, संदीप मोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
........
बचत गटांची स्वतंत्र ओळख गोरेगावपासून होईल : तटकरे
माणगाव (बातमीदार) ः महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत व्हावा, यासाठी मी नेहमी आग्रही होतो. आज आपली ही इच्छा पूर्ण झाली असून, भविष्यात कधी जगातील इतिहास संशोधक किल्ले रायगडावर येतील तेव्हा ते गोरेगावातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतील, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांची स्वतंत्र ओळख गोरेगावपासून होईल आणि खरे समाधान मिळेल, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. खासदार तटकरे यांच्या माध्यमातून गोरेगाव हौदाची आळी येथे उभारण्यात आलेल्या म्हसोबा मंदिर आणि सामाजिक सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. शनिवारी (१२ जुलै) झालेल्या या कार्यक्रमास विजयराज खुळे, श्रीनिवास बेंडखळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, युवा कार्याध्यक्ष शादाब गैबी, सरपंच जुबेर अब्बासी, हौदाची आळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संजय पेंढारी आणि ग्रामस्‍थ, महिला मंडळ बचत गटांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांनी तयार केलेले पदार्थ इतके चविष्ट असतात की त्याची सर पंचतारांकित हॉटेलमध्ये जास्तीचे पैसे मोजून खाल्लेल्या पदार्थांना येत नाही. बचत गटांतील महिलांनी तयार केलेल्या पदार्थांना योग्य बाजारपेठ मिळाली, तर ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळेल आणि त्यासाठी मी आदिती तटकरे यांच्याशी बोलून पदार्थांच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळवून देऊ, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी गोरेगाव येथे दिली.
..............
साईभक्त मित्रमंडळातर्फे नारळफोडी स्पर्धा
अलिबाग (वार्ताहर) ः आषाढ पागोळी सुरू होताच अलिबागमध्ये विविध ठिकाणी नारळफोडी स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याप्रमाणे नागावमधील साईभक्त मित्रमंडळातर्फे रविवारी (ता. २०) नारळफोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांक तीन हजार, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या संघास प्रत्येकी दोन हजार रुपये तसेच प्रत्येक विजेत्याला आकर्षक चषकही देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. प्रत्येक संघाला पाच नारळ दिले जातील. नावनोंदणी १७ जुलैपर्यंत सायंकाळी सात वाजेपर्यंत करावयाची आहे. स्पर्धा श्री साईबाबा मंदिर, कोठार भाट, नागाव येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी हर्षल मोरे (९५४५८९६९६६) अथवा सचिन मोरे (९९२१५५११३५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com