कर्तृत्वान महिलांना पुढे येण्यासाठी वाव मिळाला पाहिजे : वरदा तटकरे
कर्तृत्ववान महिलांना पुढे येण्यासाठी वाव मिळाला पाहिजे : वरदा तटकरे
रोहा, ता. १४ (बातमीदार) ः आजच्या महिला चूल आणि मूल या गोष्टीपर्यंत मर्यादित न राहता विविध क्षेत्रात काम करताना दिसून येत आहेत. समाजात काम करताना सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, विधी विभाग इत्यादी क्षेत्रात रोह्यातील महिला उल्लेखनीय काम करित आहेत. या महिला आणि तरुणीदेखील कर्तृत्ववान आणि मेहनती आहेत. त्यांना पुढे येण्यासाठी वाव मिळाला पाहिजे, असे मौलिक विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पत्नी वरदा तटकरे यांनी व्यक्त केले.
रोहा भाटे वाचनालयात डॉ. अवनी समीर शेडगे यांच्या पुढाकाराने खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नारी सन्मान सोहळा पार पडला. या वेळी शहरातील शैक्षणिक, सामाजिक, महिला बचत गट, महिला गृहिणी, व्यापार अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २४ महिलांना सन्मानचिन्हा शाल देऊन वरदा तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना वरदा तटकरे म्हणाल्या की, आपला संसार संभाळून विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा आज सत्कार आणि सन्मान होत असल्याने माजी नगराध्यक्ष समीर शेडगे व डॉ. अवनी शेडगे यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. असे सांगत गुलाबाचे फुल फुललेले दिसते, परंतु ते काढताना त्याच्या मागे काटे असतात. ते आपल्याला बोचतात नंतर त्यांचे नंदनवन होते. हे आपल्या महिलांच्या बाबतीत तयार करायचे आहे, असे त्या म्हणाल्या. या वेळी आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आपले विचार मांडले. या वेळी व्यासपीठावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा काफरे, महिला आघाडी अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.