वीजपुरवठ्याचा खेळ खंडोबा

वीजपुरवठ्याचा खेळ खंडोबा

Published on

कासा, ता. १५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा ते गडचिंचले या सुमारे ५० ते ६० किमीच्या पट्ट्यात वसलेल्या १५ ते २० गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा पूर्णतः विस्कळित होऊन नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या डहाणू उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

कासा भागात सुमारे २० ते २२ हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी बसवलेले जुने काँक्रीट आणि लोखंडी खांब आज मोडकळीस आले असून, कोणत्याही क्षणी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या सडलेल्या पोलवरच वीजवाहिनीच्या तारांचे जाळे तग धरून आहे. दर पावसाळ्यात वाऱ्यामुळे किंवा झाड पडल्याने वीज खंडित होणे आता या भागातील नित्याचेच झाले आहे.

ग्रामस्थांनी कासा उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता मोहन बनसोडे यांच्याकडे, तसेच महावितरणच्या कासा व डहाणू कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. महावितरणच्या डिजिटल ग्राहक पोर्टलवर तब्बल २४ ते २५ वेळा तक्रारी नोंदवूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विद्युत कायद्यानुसार तक्रारी निवारणासाठी निश्चित कालावधी देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र याकडे दुर्लक्षच होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवून नवीन खांब आणि वायरिंगची कामे तातडीने हाती घ्यावीत. तसेच पावसाळ्यात कर्मचारी व अधिकारी तत्काळ प्रतिसाद देतील, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

विद्यार्थ्यांचे हाल
या पट्ट्यात सुमारे सहा शासकीय आश्रमशाळा आणि सहा आरोग्य उपकेंद्र आहेत. सायवन आरोग्य उपकेंद्रात १० ते १२ गावांतील रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र रात्री वीज नसल्यामुळे सर्पदंश, अपघात किंवा प्रसूती रुग्णांवर टॉर्च वा मोबाईलच्या प्रकाशात उपचार करावे लागत आहेत. तसेच शेतकऱ्यांनाही सिंचन व शेतीच्या इतर कामांसाठी वीज नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कार्यालय स्थलांतराची मागणी
कासा येथील महावितरणचे कार्यालय गेल्या आठ महिन्यांपासून सूर्यनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे ३० ते ३५ किमी अंतरावरून अनेक ग्राहकांना वीजविषयक तक्रारी व समस्यांसाठी यावे लागते. त्यात कार्यालयात शाखा अभियंता किंवा कर्मचारी नसल्यास मोठी पायपीट आणि खर्चाचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महावितरणचे कार्यालय पुन्हा कासा येथेच स्थापन करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

शहरात सेवा सुरळीत
महावितरणचे अधिकारी कार्यालयापासून ५० ते ६० किमी अंतरावर शहरातच मुक्काम ठेवल्याने वीज खंडित झाल्यावर त्वरित गस्त घालणे किंवा दोष तपासणे होत नाही. परिणामी, वीज पूर्ववत होण्यासाठी अनेक तास किंवा कधी कधी दिवसभर प्रतीक्षा करावी लागते. कासा व डहाणू शहरात मात्र वीज त्वरित पूर्ववत केली जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com