जलवाहिनीचा वॉल्‍व सुरू करण्याची चढाओढ

जलवाहिनीचा वॉल्‍व सुरू करण्याची चढाओढ

Published on

जलवाहिनीचा वॉल्व्ह सुरू करण्याची चढाओढ
भाजपच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारीत करून पाणी सोडत असल्याचे व्हिडिओ व्हायरल, सिडकोचे अधिकारी, कर्मचारी हतबल
खारघर, ता. १४ (बातमीदार) : खारघर परिसरात आजही काही सेक्टरमध्ये अल्‍पदाबाने पाणीपुरवठा होत नसल्यामुळे रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दरम्यान, आपल्या प्रभागात पुरेसे पाणी मिळविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली असून, स्वतः वॉल्व्ह सुरू करीत असल्‍याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहे. यामुळे काही विभागात मुबलक पाणी, तर काही भाग तहानलेले आहेत.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी खारघरमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. या वेळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रहिवाशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्‍न केले. मोरबे धरणाच्या जलवाहिनीवर आंदोलन, सिडकोच्या गोल्फ कोर्समध्ये गोल्फ खेळण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना घेराव घालणे आदी प्रकारांतून पालिका निवडणुकीत भरघोस मते मिळवून खारघरमधून १२ नगरसेवक बहुमताने विजयी झाले. निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी पुरेसे पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा खारघरवासीयांना होती, मात्र त्‍याची पूर्तता झालीच नाही.
खारघर परिसरात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीत वाढ आहे. तसेच लवकरच महापालिका निवडणूक होणार असल्यामुळे आपल्या प्रभागाला पुरेसे पाणी मिळावे यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रात्री जलकुंभ गाठून प्रभागात पाणीपुरवठा होणाऱ्या जलवाहिनीचे वॉल्व्ह स्वतः सुरू करीत आहेत. असाच एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. दरम्यान, पाणी मिळविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्‍याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. जलकुंभवर प्रवेश करून माजी नगरसेवक आणि पदाधिकारी स्वतः वॉल्व्ह सुरू करीत असल्यामुळे सिडकोचे अधिकारी आणि कर्मचारी हतबल झाले आहे. याविषयी सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, कर्मचारी सर्वांना समान पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत, मात्र काही पक्षाचे पदाधिकारी रात्री, अपरात्री जलकुंभावर प्रवेश करून स्वतःहून वॉल्व्ह सुरू करून कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगितले.

खारघरमध्ये खूप वर्षांपासून पाणी समस्या भेडसावत आहे. सर्वच पक्ष या मुद्द्यावर राजकारणच करीत आहेत. वॉल्व्ह सुरू करण्याची परवानगी कुणालाही नाही. सिडको पुरेशी पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत असेल, तर त्यांनी सोसायट्यांना मोफत टँकर देण्यासाठी सिडकोवर दबाव आणायला हवा.
- मंगल कांबळे, अध्यक्ष, स्वच्छ खारघर फाउंडेशन

आमदारांकडून समज
पाणीवाटपावरून खारघरमधील भाजपच्या दोन वरिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळाली. लवकरच महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकजूट असावी तसेच कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी परिसरातील दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी ऑनलाइन संपर्क साधून समज दिल्‍याचे समजते.

Marathi News Esakal
www.esakal.com