अजब रस्त्यावरील गजब चौथरा

अजब रस्त्यावरील गजब चौथरा

Published on

बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : बदलापूर पूर्वेकडील एमआयडीसीकडून खरवई कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बसवलेला चौथरा अपघाताला निमंत्रण देत आहे. जवळपास १५ ते २० फूट रुंद आणि २० ते २५ फूट लांबीचा या चौथऱ्यामुळे येथील रस्ता अरुंद झाला आहे. सध्या रस्त्याची आणि त्यावरील चौथऱ्याची शहरात चर्चा सुरू आहे.
खरवई, कर्जत दिशेला जाणाऱ्या महामार्गाला जोडणारा आणि बदलापूर पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातून जाणारा मुख्य रस्त्याच्या वळणावर एमआयडीसीच्या रासायनिक पाणी जमा होणारा व्हॉल्व आहे. त्यासाठी एमआयडीसीने त्या ठिकाणी सिमेंटचे साधारण पाच फुटांचे बांधकाम केले आहे. मात्र, या पाच फुटांच्या सिमेंटच्या बांधकामाला संरक्षण देण्यासाठी, सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी जवळपास २० फूट रुंद व २५ फूट लांबीचा सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करून चौथरा उभारला आहे. एवढ्या लहानशा बांधकामासाठी एवढा मोठा चौथरा बांधल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, वळणावरून जाताना अंदाज न आल्याने अनेक वाहने या चौथऱ्याला धडकतात. यामुळे अनेक वाहनांचा अपघातही झाला आहे. या परिसरात पथदिवे नसल्याने अनोळखी वाहनांना रात्रीच्या वेळेत चौथऱ्याचा अंदाजच लागत नाही.

रेडियम लावणार
संबंधित विभागाकडून यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, प्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाने हा चौथरा एमआयडीसीने बांधल्याचे सांगितले. तर एमआयडीसी प्रशासनाने हा चौथरा सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधल्याचे सांगितले. पालिकेनेही या माहितीला दुजोरा दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत कुमार मानकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वाहनचालकांना या चौथऱ्याचा अंदाज यावा, यासाठी चौथऱ्याच्या चारही बाजूच्या भिंतींना रेडियम लावण्याचे काम हाती घेणार असल्याचे सांगितले.

चौथऱ्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. वळणावरच चौथरा असल्यामुळे कित्येकदा वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही. छोट्याशा बांधकामाच्या संरक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने इतक्या लांबी, रुंदीचा चौथरा ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी बांधला आहे का? अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.
- राणी जवळेकर, वाहनचालक


बदलापूर : खरवई कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर चौथरा बांधण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com