देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईत १ ऑगस्टपासून धावणार!

देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईत १ ऑगस्टपासून धावणार!

Published on

मुंबईत धावणार १ ऑगस्टपासून ई-वॉटर टॅक्सी
गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए मार्गावर जलद वाहतूक सुविधा
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज ई-वॉटर टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यास सज्ज झाली आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून ही ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए आणि डोमॅस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन जलमार्गांवर नियमितपणे धावणार आहे. ही सेवा केवळ एका मार्गापुरती मर्यादित न राहता टप्प्याटप्प्याने बेलापूर, घारापुरी आणि मांडवापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.
ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्याने अनेक प्रवाशांना प्रवासासाठी आणखी एक वेगळा, स्वस्त आणि पर्यावरणस्नेही पर्याय मिळणार आहे. विशेष म्हणजे ही वॉटर टॅक्सी परदेशातून आयात न करता माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली आहे. ‘एमडीएल’ने एकूण सहा वॉटर टॅक्सी तयार केल्या आहेत. त्यातील पहिली २४ आसनी वातानुकूलित टॅक्सी सध्या इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. कंपनीशी आणि राज्य सरकारशी सर्व कागदोपत्री करार पूर्ण झाला आहे. ही टॅक्सी सध्या अंतिम तांत्रिक चाचण्यांच्या टप्प्यात आहे.
---
परवडणाऱ्या दरात सेवा
मुंबईत यापूर्वी विविध मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती; मात्र त्या सर्व पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या असल्याने त्याचे तिकीटदर सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळे काही काळातच त्या सेवा बंद पडल्या; मात्र ई-वॉटर टॅक्सीमुळे इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार असल्याने प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
----
कशी आहे ई-वॉटर टॅक्सी?
लांबी : १३.२७ मीटर
रुंदी : ३.०५ मीटर
प्रवासी क्षमता : २४ प्रवासी
वेग : १४ नॉटिकल माइल्स
बॅटरी क्षमता : ६४ किलोवॅट (चार तासापर्यंत)
---
१ ऑगस्ट २०२५ पासून ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होत आहे. त्यासाठी जेएनपीए येथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम आठवडाभरात सुरू होणार आहे.
- सोहेल कझानी, इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनी
---
चार्जिंग स्टेशन अंतिम टप्प्यात
ई-वॉटर टॅक्सीसाठी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस, जेएनपीए जेट्टीवर चार्जिंग स्टेशनची उभारणी सुरू आहे. जेएनपीएमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉइंट उभारण्याचे काम येत्या आठवडाभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत पातळीवरच वॉटर टॅक्सीची सर्व साखळी निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com