खारघरच्या पाणी वितरणाचे नियोजन ढेपाळले

खारघरच्या पाणी वितरणाचे नियोजन ढेपाळले

Published on

खारघरच्या पाणी वितरणाचे नियोजन ढेपाळले

जलवाहिन्यांवर वारंवार दुरुस्तीची कामे
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः भरपावसाळ्यात खारघरमध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असल्‍याने रहिवाशांकडून सिडकोविरोधात संताप व्यक्त होत आहे. महिनाभरापासून खारघरमध्ये अनेक सोसायट्यांना टँकरवर तहान भागवावी लागत आहे. सेक्टर ३५, ३६ ओवे गाव आदी भागांना महिन्यातून किमान चार वेळा तरी अपुरा पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागते. सिडकोतर्फे वारंवार जलवाहिन्यांवर घेण्यात येणारी दुरुस्तीची कामे अपुऱ्या पाणीपुरवठ्यास कारणीभूत ठरत आहेत.
खारघर हा वेगाने विकसित होणारा नोड आहे. या नोडमध्ये सिडकोची आतापर्यंतची सर्वात मोठी सदनिका असणाऱ्या गृहसंकुले आहेत. तसेच खारघरचा व्याप्ती आता तळोजापर्यंत वाढली आहे. तळोजा कारागृहाच्या परिसरात सेक्टर ३५ आणि ३६ या भागात एक हजार पेक्षा जास्त घरे असणाऱ्या २२ ते ५२ मजल्यांपर्यंतच्या इमारती होत आहे. या इमारतींना नजरेसमोर ठेवून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला अपयश आले आहे. मे महिन्यापासून दर सोमवारी खारघरमध्ये पाणी कपात करण्यात आली होती. मात्र, आता पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी पाणीसमस्‍या सुटलेली नाही. सिडकोच्या हेटवणे धरणात मुबलक पाणीपुरवठा आहे. तरी खारघरमधील रहिवाशांवर पाणी संकट निर्माण होत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्‌यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांची धावपळ होते.


आठवड्यातून एकदा भरतो जलकुंभ
खारघर नोडला दिवसाला ७५ एमएलडी पाणी पुरवठ्याची गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी सिडकोने ५४ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ तयार केला आहे. हा जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सिडकोतर्फे एक दिवसाचा शटडाऊन घेण्यात येतो. या दिवशी सगळ्या खारघरमध्ये अल्प पाणीपुरवठा केला जातो. जेव्हा हा जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरतो. तेव्हा आठवडाभर संपूर्ण खारघरला नियमित पाणीपुरवठा करता येतो, असे सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.


स्वप्नपूर्ती सोसायटीला फटका
सिडकोने व्हॅलीशिल्प आणि स्वप्नपूर्ती या सर्वात जास्त सदनिका असणारी गृहसंकुले तयार केली आहेत. नवीन सोसायट्या असताना मुबलक प्रमाणात पाणी होते. मात्र चार महिन्यांपासून स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. वारंवार स्वप्नपूर्ती सोसायटीत अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांना आठवड्यातून किमान दोन वेळा तरी पाणी विकत आणावे लागत आहे.

नवीन जलवाहिनीची मागणी
हेटवणे धरणातून जलवाहिनीवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने कमी पाणी पुरवठा होत होता. मात्र आता हे काम पूर्ण झाल्यामुळे दोन ते तीन दिवसांत पाणी समस्या सुटेल. स्वप्नपूर्तीतील रहिवाशांनी वेगळ्या जलवाहिनीची मागणी केली आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता प्रकाश शेवतकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com