भरतीप्रक्रियेसाठी पालिकेने कसली कंबर
भरती प्रक्रियेसाठी पालिकेने कसली कंबर
१६ ते १९ जुलैदरम्यान जिल्ह्यातील २८ केंद्रांवर परीक्षा
वाशी, ता. १४ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत गट-क आणि गट-ड मधील एकूण ३० संवर्गातील ६६८ पदांकरिता ८४, ७७४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पदांकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षा १६ ते १९ जुलै यादरम्यान घेण्यात येणार आहेत, तर उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे यादृष्टीने ११ जिल्ह्यांमध्ये २८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे.
श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिकेकडे पाहिले जाते. मागील काही वर्षांत महापालिकेचे उत्पन्न वाढत आहे. शिवाय अनेक विकासात्मक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामुळे विविध प्रकल्पासाठी तसेच नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता लागू नये, यासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी गट-क आणि ड मधील एकूण ३० संवर्गासाठी ६६८ पदांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. त्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या विविध पदासाठी ८४, ७७४ अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ११ जिल्ह्यांमध्ये ११ परीक्षा केंद्रावर पालिकेने चोख व्यवस्था केली आहे. पालिकेकडून परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे प्रवेश अर्जदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर आतापर्यंत ७० हजार विद्यार्थ्यांनी हॉल तिकीटदेखील ऑनलाइन काढले असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पदभरतीच्या परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्याचे तंतोतंत पालन करावे तसेच केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे, असेदेखील सूचित करण्यात आले आहे, तर पालिकेचे कर्मचारीदेखील या परीक्षेमध्ये परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. नवी मुंबई महापालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पद्धतीने होत आहे. त्यामुळे, नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणाऱ्या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी, असेदेखील नवी मुंबई महापालिकेकडून सूचित करण्यात आले आहे.
........................
बॉक्स
नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवर ‘गट-क’ आणि ‘गट-ड’ मध्ये ३० संवर्गात ६६८ पदांसाठी सरळसेवेव्दारे ८४, ७७४ इतके ऑनलाइन अर्ज आले आहेत. त्यामधील २३,३४७ अर्ज हे लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या १३५ जागांसाठी प्राप्त झाले आहेत, तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) संवर्गाच्या ५१ जागांसाठी १५, ४४७ तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या ८३ जागांसाठी १४, ५५८ आणि स्टाफ नर्स/मिडवाइफ संवर्गाच्या १३१ पदांसाठी १२,६३४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.