मध्य रेल्वेवर आठ वर्षात ८,२७३ प्रवाशांचा मृत्यू
आठ वर्षांत आठ हजार प्रवाशांचा मृत्यू
मध्य रेल्वेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र; सर्वाधिक मृत्यू रूळ ओलांडताना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासात गेल्या आठ वर्षांत ८,२७३ मृत्यू झाले. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना (५,५६४ ) आणि धावत्या लोकलमधून पडल्याने (२,७०९) झाल्याची माहिती सोमवारी (ता. १४) मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.
उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात पालघरस्थित यतीन जाधव यांनी केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी मध्य रेल्वेकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. त्याबाबत याचिकाकर्त्यांना अभ्यास करून पुढील आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. तत्पूर्वी, मुंब्रा येथील घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश खंडपीठाने मागील सुनावणीवेळी रेल्वेला दिले होते. तसेच प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले होते. त्यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रविंद्र वंजारी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.
---
वर्षनिहाय प्रवाशांचा मृत्यू
वर्ष रेल्वे रूळ ओलांडणे धावत्या रेल्वेतून पडणे
२०१८ १०२२ ४८२
२०१९ ९२० ४२६
२०२० ४७१ १३४
२०२१ ७४८ १८९
२०२२ ६५४ ५१०
२०२३ ७८२ ४३१
२०२४ ६७४ ३८७
२०२५ २९३ १५०
(मेपर्यंत)
---
मध्य रेल्वेच्या उपयायोजना?
- रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई
- शाळा, महाविद्यालयांत जनजागृती
- रेल्वेस्थानकांमध्ये त्यासंदर्भात उद्घोषणा
- तीन वर्षांत १२९ कायमस्वरूपी आणि १,१३८ तात्पुरती अतिक्रमणे हटवली
- स्थानकाच्या दोन्ही टोकांचे रॅम्प हटवून दोन फलाटांमध्ये कुंपण लावण्यात आले
- रेल्वे रूळ ओलांडणारी ७३ ठिकाणे शोधून तिथे आरपीएफ पथक तैनात
- धावत्या लोकलमधून प्रवासी पडू नयेत म्हणून डब्यातील लोखंडी रॉड हात निसटणार नाही अशा पद्धतीने बसवले
- ८०० हून अधिक आस्थापनांना कामांच्या वेळात बदल करण्याची सूचनाही
----------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.