उल्हासनगरात ‘दारूबंदी’ची झलक
उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) :- जादा कर नको, अन्यथा हॉटेल व्यवसाय बंदच!, असा थेट इशारा देत उल्हासनगरातील बारमालकांनी सोमवारी (ता. १४) सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकारने दारूवरील व्हॅट, उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कात मोठ्या प्रमाणात केलेल्या वाढीविरोधात संतप्त प्रतिक्रिया देत शहरातील १००हून अधिक बार आणि परमिट रूम दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आले. या आंदोलनामुळे उल्हासनगरात एक प्रकारे ‘दारूबंदी’च दिसून आली.
दारूवरील व्हॅटमध्ये दुप्पट वाढ, परवाना शुल्कात १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट परिणाम बार व्यावसायिकांच्या व्यवहारावर होत आहे. सरकारने ही करवाढ तत्काळ मागे घेतली नाही, तर चायनीज हॉटेल्स आणि ढाब्यांमध्ये बेकायदा दारूविक्री वाढेल. गोवा-दमणहून आणलेली दारू काळ्या बाजारात विकली जाईल आणि अधिकाऱ्यांचे नियंत्रणही सुटेल, असा स्पष्ट इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश शेट्टी यांनी दिला. पूर्वीच कर वाढवले होते. आता पुन्हा अशी जबरदस्त वाढ कशी सहन करणार. आम्ही कोणत्या नफ्यावर व्यवसाय चालवायचा? परिस्थिती अशीच राहिली, तर व्यवसायच बंद करावा लागेल, असा संतप्त सूर सचिव नरेश कंडारे यांनी लावला. या आंदोलनात अध्यक्ष प्रकाश शेट्टी, नानिक आहुजा, नरेश कंडारे, उदय शेट्टी, सुरेंद्र शेट्टी, मनीष लोकवानी यांच्यासह अनेक बार मालक सहभागी झाले होते.
राज्य सरकारकडून वारंवार होणाऱ्या करवाढीमुळे आमच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आधीच बार व्यवसाय अनेक अडचणींमध्ये अडकलेला आहे. आता व्हॅट, परवाना आणि उत्पादन शुल्कात झालेली वाढ म्हणजे व्यवसायाची गळचेपीच आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने व्यवसाय करतो, नियम पाळतो; पण सरकारने आम्हाला अडचणीत आणले आहे. ही वाढ तत्काळ मागे घेतली नाही, तर व्यवसाय बंद करून हजारो कामगारांच्या हातून रोजगार हिरावून घेण्याची वेळ येईल.
- उदय शेट्टी, हॉटेल व्यवसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.