२२ जुलैला पालिकेवर जनआक्रोश मोर्चा
मासळी मंडई वाचवण्यासाठी
२२ जुलैला जनआक्रोश मोर्चा
राज्यातील मच्छीमार बांधव एकवटणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईचे स्थलांतर करण्याच्या निर्णयाविरोधात कोळी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता क्रॉफर्ड मार्केट ते महापालिका मुख्यालयावर मच्छीमारांचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. यामध्ये राज्यभरातून हजारो मच्छीमार सहभागी होणार आहेत. दरम्यान, आज अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने पालिका मुख्यालय परिसरात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
मंडई स्थलांतर करण्याच्या विरोधात कोळी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, दि मुंबई फ्रेश फिश असोसिएशन, मुंबई जिल्हा कोळी महिला विविध कार्यकारी सहकारी संस्था, शाश्वत कोकण परिषद आदी संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. २२ जुलै रोजी महापालिकेवर कोळी वादळ धडकणार, असा इशाराही समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिला आहे.
---
नाममात्र भाड्यावर भूखंड बहाल
क्रॉफर्ड मार्केटमधील हे मासळी मार्केट १९७१ पासून मासळी व्यवसायाचे आर्थिक केंद्र आहे. या मंडईत दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या ठिकाणी संपूर्ण कोकण किनारपट्टीपासून वसई, वर्सोवा, रायगड, रत्नागिरी ते मालवणपर्यंतचे मासळी उत्पादक विक्रीसाठी येतात; मात्र पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे ही मंडई संकटात सापडली असून, एका खासगी विकसकाला नाममात्र भाड्यावर भूखंड बहाल करून कोळी समाजाचा व्यवसाय उद्ध्वस्थ करण्यात आल्याचा आरोप मच्छीमार कृती समितीने केला आहे.
.............
स्थलांतराला तीव्र विरोध
महापालिकेने याआधी कोळी समाजाला महात्मा फुले मंडईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी मार्केट उभारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सध्या तेथील बांधकाम फक्त ४० टक्के पूर्ण झाले असून, व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात फुटपाथवर व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात आहे, असा आरोप सरचिटणीस संजय कोळी यांनी केला. कोळी महिलांचा उदरनिर्वाहही धोक्यात आल्याचे स्पष्ट करीत बेलासिस ब्रिजमुळे बाधित झालेल्या महिलांसाठी नव्याने परवाने जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.