पावलोपावली खड्ड्यांचा सामना
वसई, ता. १४ (बातमीदार) : पावसाला सुरुवात होताच वसई-विरार महापालिका परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अन्य शहरांमध्ये खड्डे असतात, मात्र त्यांचा आकार कमी असतो. वसई-विरारमधील खड्ड्यांचा आकार रस्त्यांपेक्षा मोठा असून, हे खड्डे पावलोपावली दिसत आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्यांचा प्रत्येक रस्त्यावर या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
वसई-विरार महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारीचा पाढा वाचला जात आहे. वसई-विरार शहरात महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका, पोलिस यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील वाहने याच मार्गावरून ये-जा करतात. एकीकडे प्रशासन रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करते, तर पावसाळी रस्ते दुरुस्तीसाठीदेखील निविदा काढून कामाचे कार्यादेश देत खर्च होतो.
आता गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. अशातच भक्त मूर्ती केंद्रातून गणेशाची मूर्ती घेऊन जाणार आहेत. त्यामुळे रस्ते दुरुस्त न झाल्यास खड्ड्यांचे विघ्न येऊ शकते. एकीकडे शहरात रस्ते मार्गाशिवाय अन्य पर्यायी मार्गाची व्यवस्था अपुरी आहे. कारखान्यात मालाची वाहतूक करणारी अवजड वाहने रोज येत असतात, मात्र औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे.
वसई पूर्वेकडील फादरवाडी, गोखिवरे मार्ग, सातिवली, वालीव, निर्मळ भुईगाव मार्ग, सोपारा, वसई पश्चिमेकडील माणिकपूर परिसर, विरार पूर्व मार्गासह संतोषभुवन, नगीनदास पाडा, आचोळे मार्ग, तुळींज परिसर यासह अनेक भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे हाडे खिळखिळी होण्यापूर्वी रस्ते दुरुस्त करावेत, अशी साद सुजाण नागरिक प्रशासनाला घालू लागले आहेत.
ठिकठिकाणी कोंडी
पावसाळ्यात रस्ते मार्ग नादुरुस्त झाल्याचा परिणाम हा वाहतुकीवर होऊ लागला आहे. अनेक मुख्य मार्गावर कोंडी होत आहे. त्यामुळे कामावर ये-जा करण्यासाठी विलंब होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह औद्योगिक वसाहतीतील कामगारांनादेखील फटका बसत आहे.
खड्ड्यांत पाणी की पाण्यात खड्डे!
रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, पावसाचे पाणी खड्ड्यांत साचत आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे असल्याचे समजून येत नाही, अशावेळी नवशिकावू चालकांचा तोल जातो. अनेक ठिकाणी रस्ते नादुरुस्त झाले आहेत.
डागडुजीचे काम करणार!
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील जे रस्ते नादुरुस्त झाले आहेत, त्याची पाहणी करून जिथे खड्डे आहेत, तिथे लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. टप्प्याटप्याने प्रशासनाकडून डागडुजीचे काम करण्यात येईल, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रकाश साटम यांनी सांगितले.
खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहने ये-जा करताना लक्षात येत नाही. खड्ड्यांत गाडी आपटते, तसेच दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पडलेले खड्डे जीवघेणे ठरू नयेत, म्हणून वसई-विरार महापालिकेने तातडीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी लक्ष द्यावे.
- संजय सखाराम मुळ्ये, नागरिक, वसई
वसई पूर्व ते पश्चिम भागात प्रवासी वाहतूक करताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मणके, कंबरदुखी, मानदुखीचा त्रास होतो. त्यातच वाहन चालवताना खड्डे चुकवताना कसरत करावी लागते. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत, जेणेकरून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसह प्रवाशांना सोईचे होईल.
- हरेश नानावटी, रिक्षा व्यावसायिक, वसई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.