
पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर चिखल
पावसामुळे माती वाहून आल्याने चालकांची कसरत
पोलादपूर, ता. १५ (बातमीदार) ः पोलादपूरमार्गे महाबळेश्वरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. रस्त्यावर साचलेली आणि बाजूला टाकलेली लाल माती पावसामुळे वाहून आल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागते.
महामार्गासाठी खोदकाम करताना रस्त्याच्या बाजूला भराव करण्यात आला आहे, मात्र पावसामुळे रस्ता चिखलमय झाला असून, दुचाकी, चारचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक नागरिकांना याच मार्गावरून दररोज प्रवास करावा लागतो. त्यातच चिखलातून दुचाकी चालवणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पावसामुळे रस्ता निसरडा झाला आहे, त्यावर लाल माती वाहून आल्याने चालकांसह पादचाऱ्यांना अक्षरशः करसत करावी लागते.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज
या परिस्थितीचा विचार करता, प्रशासन आणि संबंधित ठेकेदार कंपनीने तत्काळ उपाययोजना करून रस्त्यावरून लाल माती हटवणे, रस्ता स्वच्छ करणे आणि वाहतूक सुरळीत होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढतच जाईल आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
पोलादपूर ः मातीचा भराव आल्याने रस्ता चिखलमय झाला आहे.
................
घोणसे घाटात दरडींचा धोका
मुसळधार पावसामुळे डोंगरदऱ्यातील माती भुसभुशीत
श्रीवर्धन, ता. १५ (बातमीदार) : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोणसे घाटातील रस्त्यालगत डोंगर-उतारांवर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. घाटमार्ग अरुंद आणि वळणावळणाचा असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनाचालकांसह पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
घाटात अनेक ठिकाणी डोंगराचा भाग खचून रस्त्यावर आला आहे. पावसामुळे माती आणि लहान-मोठे दगड रस्त्यावर येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी दरडी अर्धवट सुटल्या असून, केव्हाही कोसळतील, अशा स्थितीत आहेत. प्रशासनाकडून याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना न दिल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
दिघी बंदर ते पुणे या मार्गाच्या पहिल्या टप्प्यात माणगावपर्यंत काँक्रीटीकरण करण्यात आले आहे, मात्र घाट परिसरातील भूभाग अत्यंत निसरडा आणि पावसामुळे ढासळत असल्याने नुकतेच तयार झालेले रस्तेही दरडींमुळे वाहतुकीस बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचरा होत असल्यामुळे डोंगर भाग भुसभुशीत झाल्याने दरड कोसळण्याची शक्यता आहे.
प्रवाशांचा जीव धोक्यात
शैक्षणिक, वैद्यकीय आणि सरकारी कामांसाठी मोठ्या संख्येने प्रवासी घोणसे घाटातून दररोज ये-जा करतात. तसेच दिघी बंदरातून होणारी मालवाहतूकही याच मार्गावरून होते. सध्या घाटातील अनेक दरडी धोकादायक स्थितीत असून, मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
श्रीवर्धन : घोणसे घाटात असे दगड कोसळतात.
--------
एसटीचे वेळापत्रक कोलमडले
रेवदंडा, ता. १५ (बातमीदार) : आठवडाभर विश्रांती घेतलल्या पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. सकाळच्या सत्रात शाळांना सुट्टी दिल्याने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या मुलांना घरी परतावे लागले. पावसामुळे लांब पल्ल्याच्या एसटीचे वेळापत्रक कोलमडले होते. सरकारी कार्यालयांत मनुष्यबळाचा अभाव असल्याने व्यवहार संथ गतीने सुरू होते. भाजी व फळ बाजारात वर्दळ कमी होती. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे भातलावणीची कामे खोळंबली. चौलमधील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
रेवदंडा ः चौलमधील आग्राव मार्गाला नाल्याचे स्वरूप आले होते.
........................
पोयनाड बाजारपेठेकडे ग्राहकांची पाठ
पोयनाड (बातमीदार) : दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी पोयनाड परिसराला चांगलेच झोडपले. सोमवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याने शुकशुकाट होता. खड्डे आणि त्यात साचणाऱ्या पाण्यामुळे पेण-अलिबाग राज्य मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता, तर अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. पाऊस चांगला झाल्याने परिसरातील पर्यटनस्थळे बहरली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.