एमआयडीसी रस्त्यात जलतरण तलाव
एमआयडीसी रस्त्यात जलतरण तलाव
पाण्यात पोहत अनोखे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : शहरातील पूर्वेतील पेंढरकर महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या एमआयडीसी काँक्रीट रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे. मागील दोन वर्षांपासून पावसात ही परिस्थिती उद्भवत असून, याकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. त्यामुळे जागरूक नागरिक सत्यवान म्हात्रे यांनी मंगळवारी (ता. १५) साचलेल्या घाण पाण्यात पोहत अनोखे निषेध आंदोलन केला. रस्ता मध्यभागी खोलगट झाल्याने त्या भागात पाणी साचत आहे; मात्र त्याचा निचरा होण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नसल्याने नागरिकांनी हे आंदोलन केले.
डोंबिवली एमआयडीसीअंतर्गत येणाऱ्या पेंढरकर महाविद्यालयाजवळील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले आहे. पेंढरकर महाविद्यालय ते पोस्ट ऑफिसपर्यंतचा रस्ता सिमेंटचा बनविण्यात आला आहे; मात्र या ठिकाणी असलेल्या गटाराची बांधणी व्यवस्थित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय नसल्याने डोंबिवली पोस्ट ऑफिस परिसरातदेखील गटाराचे घाण पाणी शिरून तळे साचत आहे. रस्त्याचा मध्यभाग हा खोलगट असल्याने त्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचत आहे. पावसाळ्यात या पाण्यात मासेदेखील आल्याचे डोंबिवलीकरांनी याआधी अनुभवले आहे.
एमआयडीसी पोस्ट ऑफिस, कामा संघटनेचे ऑफिस, हॉटेल्स, कंपन्या या भागात असल्याने येथे काम करणारे अनेक कर्मचारी या रस्त्याचा वापर करतात. तसेच डोंबिवलीतून एमआयडीसीमार्गे कल्याण दिशेला जाणारे वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. या साचलेल्या घाण पाण्यातूनच त्यांना आपली वाहने न्यावी लागतात. दुचाकीचालक येथून दुचाकी नेताना अर्धेअधिक भिजतात. त्यामुळे त्यांना अक्षरश: कसरत करावी लागते. तसेच अनेकदा बाजूच्या बांधावरून आपली वाहने नेण्याचा प्रयत्न करतात. यात कधी कधी गाडी घसरण्याचादेखील धोका असतो. विशेष म्हणजे एमआयडीसीचे कार्यालय या रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे, तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याचे दिसून येते. म्हात्रे यांच्या या आंदोलनाचे वाहनचालकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. याविषयी कोणीच बोलत नाही. तुम्ही आज आवाज उठविला त्याबद्दल धन्यवाद, असे म्हणत नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला.
लाखो रुपये खर्च करून हा रस्ता बनविला आहे. एमआयडीसीअंतर्गत हा रस्ता येत आहे. रस्ता बनविणाऱ्या अभियंत्याने रस्ता समांतर पातळीत न बनविल्याने गेल्या दोन वर्षांपासून ही स्थिती उद्भवत आहे. येथे जलतरण तलाव तयार झाला असून, यात किमान पोहण्याचा तरी आनंद घ्यावा, असे आवाहन मी त्यांना करतो. अधिकाऱ्यांना कळविले तरी ते त्याकडे कानाडोळा करीत असल्याने अखेर आज पाण्यात उतरावे लागले.
- सत्यवान म्हात्रे, उपाध्यक्ष, २७ गाव संघर्ष समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.