मासळी मंडई स्थलांतराला विरोध

मासळी मंडई स्थलांतराला विरोध

Published on

धारावी, ता. १५ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या भूमिगत मासळी मंडईविरोधात पारंपरिक मासळी व्यवसायाचे रक्षणासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आक्रमक झाली आहे. याच अनुषंगाने मंगळवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता ‘ कोळी जनआक्रोश मोर्चा ’काढणार आहे.
१९७१ पासून कार्यरत असलेल्या पलटण रोड येथील मासळी मंडईला पालिकेच्या धोरणांमुळे संकट निर्माण झाले आहे. राज्यातून दररोज १५ हजार पेक्षा जास्त मासळी विक्रेते, व्यापारी, महिला आणि वाहतूकदार मंडईत व्यवसाय करतात. ८७ घाऊक व्यापारी, १५७ कोळी महिला विक्रेते आणि अन्य घटक कार्यरत आहेत. या भूखंडाचे आरक्षण रद्द करून तो भूखंड अवा डेव्हलपर्स खासगी व्यावसायिकाला ३६९ कोटींमध्ये ३० वर्षांच्या भाडेकरारावर दिला. पुढील ३० वर्षांसाठी केवळ एक रुपया ते १००१ रुपयांच्या दरात भाडे घेतले जाणार असल्याने हा व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. महात्मा जोतिबा फुले मंडईत जागा देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते, मात्र ती जागा तळघरामध्ये असून, ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. तरी पालिका स्थलांतरासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, सरचिटणीस संजय कोळी, महिला अध्यक्षा नयना पाटील, शेखर घाडगे, व्यापारी सलीम नगानी उपस्थित होते.
-----------------------------------------------
आरपारच्या लढ्याचा इशारा
ताडदेव परिसरातील कोळी महिलांच्या रोजगारावरही बांधकामाचा परिणाम झाल्याने त्यांना नवीन परवाने देण्याची मागणी केली जात आहे. कोळीबांधवांना स्थलांतरित करू नये. त्यांना त्यांचे पूर्वीच्या मूळ ठिकाणी व्यवसाय करू द्यावा. मुंबई ही प्रथम आगरी, कोळी, भंडारी आणि मराठी माणसांची असून, आमच्या कोळी भगिनींवर आणि त्यांच्या मासेविक्री व्यवसायावर गदा येऊ देणार नाही. त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत कोळी बांधवासोबत आरपारची लढाई लढण्याचा इशारा रिपब्लिकन नेते सलीम खतीब यांनी दिला आहे.
------------------------------------------
पालिका मुख्यालयावर धडक
क्रॉफर्ड मार्केट येथून हा मोर्चा महापालिका मुख्यालयापर्यंत निघणार आहे. मोर्चात राज्यभरातून हजारो कोळीबांधव सहभागी होणार असून, हा आंदोलनाचा प्रारंभ असून, जोपर्यंत भूखंड कोळी समाजाच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत लढा सुरू राहील, असा निर्धार या वेळी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com