कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

डोंबिवलीत ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर
डोंबिवली (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ बदलापूरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्याचा लाभ घेतला. विरंगुळा या ज्येष्ठ नागरिकांच्या सभागृहात शिबिर घेण्यात आले. यात रक्तदाब, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, दात, डोळे, हाडे, ईसीजी आणि स्त्रियांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. डॉ. चेतन महाजन, डॉ. सुमेध किर्डक, डॉ. सविता जावडेकर, डॉ. नीलेश विभुते, डॉ. इंद्रायणी चांदुरकर, डॉ. अश्विनी कवठणकर, डॉ. शकुंतला चुरी, डॉ. विद्या राठोड, डॉ. प्रियंका सदावर्ते, डॉ. प्राची विभुते या बदलापुरातील ख्यातनाम डॉक्टरांनी आपला वेळ देत तपासणी केली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष अमित पाध्ये, अक्षदा पाध्ये, सचिव संतोष बने, प्रकल्प प्रमुख कपिल कवठणकर, अमोल उबाळे, पराग पोतनीस यांच्यासह इतर सभासदांनी परिश्रम घेतले.
.......................
कासिम शेख एआय क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित
कल्याण (वार्ताहर) : एआयतज्ज्ञ आणि एका कॉर्पोरेट कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी कासिम शेख यांना चौथ्यांदा मायक्रोसॉफ्टच्या एआय क्षेत्रातील ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कासिम शेख हे चौथ्यांदा हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव तज्ज्ञ आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्मलेले कासिम शेख प्रसिद्ध आयटी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात. चार वर्षांपासून त्यांना एआय क्षेत्रात सातत्याने पुरस्कार मिळत आहेत. याबद्दल कासिम शेख म्हणाले, की गेल्या १६ वर्षांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करीत आहे. सामान्य माणूस घरी बसून कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल जाणून घेऊ शकेल आणि त्याच्या शंका दूर करू शकेल, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. कासिम शेख यांनी आतापर्यंत एआय विषयावर २५ पुस्तके लिहिली आहेत. ही सर्व पुस्तके इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहेत. कासिम शेख यांच्या मते मायक्रोसॉफ्टने कृत्रिम बुद्धिमत्तेतील सर्वोत्तम तंत्रज्ञान सादर केले आहे. त्याचा लाखो लोक फायदा घेत आहेत. भविष्यात एआयची गरज ओळखून भारतातील विविध विद्यापीठांमध्ये स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. कासिम शेख यांच्या एआयमधील क्षमता आणि तज्ज्ञतेमुळे त्यांना महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे कल्याणकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा कासिम शेख यांनी खोवला आहे. समाजातील सर्वच स्तरांतून यानिमित्ताने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
.............................
नऊ फुटांच्या अजगराची सुटका
कल्याण (वार्ताहर): स्थानिक सर्पमित्रांच्या सहकार्याने भंडार्ली गावातील एका जनावरांच्या गोठ्यात लपलेल्या नऊ फुटांच्या अजगराची सुटका करण्यात आली आहे. ठाणे वन विभागाअंतर्गत ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच निसर्गमुक्त केले. गोठ्यातील वासरे किंवा रेडकू हे आहारासाठी सहज शिकार आहे. अजगर गवताच्या पेंढ्यात आहे, हे लक्षात येताच गोठ्याच्या मालकाने सर्पमित्रांना संपर्क केला. स्थानिक सर्पमित्र विजय राजभोर, विशाल कंथारिया, संतोष पंडागळे, कुलदीप चिकणकर यांनी गोठ्यातील अजगराचा शोध घेत वन विभागाच्या मार्गदर्शनाने निसर्गात मुक्त केले.
........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com