रोह्यात ढगफुटी सदृश स्‍थिती

रोह्यात ढगफुटी सदृश स्‍थिती

Published on

रोहा, ता. १५ (बातमीदार) ः तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. मंगळवारी सकाळी डोंगर भागात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने रोहा बाजारपेठसह ग्रामीण भागातील तळाघर, निवी, भुवनेश्वर, चणेरा, खुटल, उडदवणे, मालसई, कोलाड, सुकेळी इत्यादी भागातील लोकवस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
महादेवखार मुख्य रस्त्यावर व भिसे खिंडीत दरड कोसळ्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. अष्टमी-कोळीवाडा व नाका भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातील हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पावसाने रौद्ररूप धारण केल्याने रोहे शहरातील कुंडलिका व नागोठणे येथील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. कुंडलिका पुलावर आणि अष्टमी नाक्यावर चार ते पाच फूट पुराचे पाणी साचल्‍याने अनेक गावांचा संपर्क तुटला. शहारासह नागोठणे, कोलाड, सुतारवाडी, धाटाव, चणेरा, भालगाव, घोसाळे तालुक्यातील अन्य भागाला पावसाने झोडपून काढले. रोहे, कोलाड बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

नागोठणे भिसे खिंडीत दरड कोसळली
डोंगरमाथ्यावरून चिखल सदृश पाण्याचा लोंढा आल्‍याने तळाघर, निवी, भुवनेश्वर, वरसे, रोहा बाजारपेठेत व लोकवस्तीत पाणी शिरल्याने कित्येक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
नागोठणे भिसे खिंडीत चार-पाच ठिकाणी दरड व रस्त्यालगत झाड कोसळल्‍याने मार्गांवरील वाहतूक ठप्प होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर आलेला मलबा, पडलेली झाडे दूर करून दोन-तीन तासांत वाहतूक सुरळीत केली. कोलाड भागातील मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती.

सायरन वाजवून सावधानतेचा इशारा
अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे. कुंडलिका नदीच्या जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने दोन्ही बाजूकडून वाहतूक बंद करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलाजवळ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्‍याने खबरदारी म्हणून रोहा नगरपालिकेने सायरन वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अष्टमी पुलावरून वाहनांना बंदी करण्यात आली होती, मात्र तरी काही उत्‍साही वाहनचालक पाण्यातून मार्ग काढताना दिसले.

धानकान्हेतील कालव्याचे पाणी मंदिरासह घरात शिरले
रोहा ः तालुक्यातील धानकान्हे गावालगत वाहणाऱ्या कालवा दुथडी भरून वाहू लागल्‍याने पाणी गावातील मंदिर तसेच आजूबाजूच्या घरांमध्ये शिरले. कालव्याची उंची गावापेक्षा जास्त असल्याने व अनेक वर्षांपासून कालव्याचा गाळ काढण्यात न आल्‍याने पुराचे पाण्याचा धानकान्हेतील ग्रामस्‍थांना बसला. मंदिर सभागृहात व घरांतध्ये चिखलयुक्‍त पाणी शिरल्‍याने मोठे नुकसान झाले.

रोहा ः डोंगरमाथ्यावरील चिखलयुक्‍त पावसाचे पाणी बाजारेपेठेतील दुकानांसह लोकवस्‍तीत शिरले.

भिसे खिंडीत दरडीमुळे रस्‍त्‍यावर आलेला मलबा काढण्यात आला.

......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com