गळक्या छताखाली शिक्षणाचे धडे

गळक्या छताखाली शिक्षणाचे धडे

Published on

गळक्या छताखाली शिक्षणाचे धडे
क्रांतिवीर भगतसिंग शाळेची दुरवस्था
टिटवाळा, ता. १५ (वार्ताहर) : शहरातील पूर्व भागातील क्रांतिवीर भगतसिंग मराठी शाळा क्रमांक ३० ची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ही शाळा कधीही कोसळू शकते अशा धोकादायक स्थितीत आहे. सध्या या शाळेत जवळपास १६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची स्थिती इतकी दयनीय आहे की, भिंतींना भेगा पडल्या आहेत. छताला गळती लागली असून, दरवाजे कुजलेल्या अवस्थेत आहेत, तर लोखंडी गेट गंजलेले आहे. पाण्याची टाकी जीर्ण झाली असून, लाकडी खांबही कुजले आहेत. तसेच ठिकठिकाणी शेवाळे साचलेले आहे. सध्या गळती थांबवण्यासाठी छतावर ताडपत्री टाकली आहे; मात्र तो केवळ तात्पुरता उपाय आहे. शाळेतील जलशुद्धीकरण यंत्रणा अपूर्ण अवस्थेत असून, नळांचीही स्थिती अत्यंत खराब आहे.

टिटवाळा शहरातील अनेक पिढ्यांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे. या शाळेच्या दुरवस्थेबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधींनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजे ग्रुपचे महेश एगडे यांनी सांगितले की, शाळेची अवस्था पाहून मन सुन्न होते. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असून, त्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर ते प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे प्रतीक आहे. जर लवकरात लवकर दुरुस्ती झाली नाही, तर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येईल.

माजी नगरसेवक संतोष तरे म्हणाले की, क्रांतिवीर भगतसिंग नावाची शाळा असूनही त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. आम्ही अनेकदा पाठपुरावा केला तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनीही यापूर्वीच मांडा पश्चिम येथील संत ज्ञानेश्वर शाळेची दुरवस्थाही प्रशासनासमोर आणली होती, पण पालिकेने हालचाल न करण्याचे धोरण स्वीकारलं आहे, असा आरोप केला.

भाजप टिटवाळा मंडळाचे प्रमुख शक्तीवान भोईर म्हणाले की, ‘‘महापालिकेचा कारभार ढिसाळ आहे. शाळांची देखभाल ही प्रशासनाची जबाबदारी असून, ती पाळली जात नाही.’’ मनसेचे टिटवाळा शाखाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी सांगितले की, ‘‘महापालिकेअंतर्गत येणाऱ्या अनेक शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ही केवळ एक शाळेची नव्हे, तर एकूणच शिक्षण व्यवस्थेतील निष्काळजीची लक्षणे आहेत. तातडीने कारवाई न झाल्यास मनसे आंदोलन करेल.’’

अधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर
स्थानिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेला शैक्षणिक साहित्य, पंखे आणि टाक्या देऊन मदतीचा हात दिला आहे; मात्र ही फक्त अल्पकालीन मदत आहे. शाळा इमारतीच्या पुनर्बांधणीची खरी गरज आहे. क्रांतिवीर भगतसिंग यांच्या नावाने असलेल्या शाळेत इमारतीत शेकडो विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत धरून शिकतात, हे दृश्य म्हणजे एक संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचं अपयश असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे विजय देशेकर यांनी व्यक्त केली. याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. शाळा विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड यांना संपर्क साधण्यासाठी फोन केला असता; मात्र त्यांनी कॉलच उचलला नाही. महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो चुकीचा असल्याचे सांगण्यात आले. अनिता परदेशी यांच्याशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com