बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बोर्डी, ता. १५ (बातमीदार) : मोकाट गुरे, श्वान यांच्याबरोबरच आता वन्यपशुंचा व भुरट्या चोरांचा उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी, बागायतदाराबरोबरच शेतमजुरांवरतीदेखील मोठे संकट ओढवले आहे. नुकतेच चिखले ग्रामपंचायत क्षेत्रातील काकड पाडा आदिवासी लोक वस्ती असलेल्या भागात बिबट्याचा वावर असल्याचे पुरावे मिळाले आहेत. वन खात्याचे कर्मचारी भोसले यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट केले आहे.
मागील काही महिन्यांपासून डहाणू तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सातत्याने बिबटे आणि रानडुकराचा वावर आणि उपद्रव वाढल्याचे तक्रारी वनखात्याकडे केल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी चिखले गावाच्या लगत असलेल्या नरपड गावात पाटील पाडा येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील वासरावर हल्ला करून बिबट्याने बळी घेतला होता. सद्य:स्थितीत भातलावणीची कामे सुरू आहेत. चालू हंगामात पाऊस लवकर झाल्यामुळे बागायतीमध्ये गवत, तसेच रानटीचाऱ्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे बागायतीमध्ये साफसफाईच्या कामाचाही वेग वाढला आहे.
बिबटे, रानडुकराच्या वावरामुळे या कामासाठी रोजंदारीवर येणाऱ्या मजुरांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बागायतदारांचे मत आहे. वन विभाग व पोलिसांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना व शेतमजुरांना संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने शेती बागायतीमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या शेतमजूर व शेतकरी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न फक्त वनखात्याचाकडून सोडवण्याच्या विचार न करता पोलिस, महसूल, कृषी विभाग यांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याची गरज आहे.
- मनोज राऊत, उपसरपंच, चिखले ग्रामपंचायत
वर्षभरापूर्वी चिखले ग्रामपंचायत परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता, या अनुषंगाने वन खात्याकडून आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधान करणे, तसेच वनखात्याची गस्त वाढविणे, अशा गोष्टीसाठी करण्यात येतील.
- प्रशांत भोसले, वनसंरक्षक, बोर्डी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.