लोकप्रतिनिधींचे गोदामांसाठी प्रयत्न आवश्यक
भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : तालुक्यातील गोदाम हे देशासाठी आवश्यक आहेत. अनधिकृत गोदाम सरकारने नियमित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण, त्याऐवजी लोकप्रतिनिधी गोदामांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे. हा येथील भूमिपुत्रांना देशोधडीला लावून २० लाख लोकांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.
तालुक्यातील गोदाम पट्ट्यातील अनधिकृत बांधकाम, शासकीय जागेवरील गोदामांवर कारवाई करण्याची मागणी अधिवेशन काळात उपस्थित झाली. त्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना सरकारसाठी निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप पदाधिकारी मंडळ अध्यक्ष श्रीधर पाटील, माजी तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, यशवंत सोरे उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधींनी भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सरकारी जागांवर बेकायदा बांधकाम आणि खोटी कागदपत्रे सादर करून मिळवलेल्या परवानगीबाबत तक्रारी अर्ज दाखल केला आहे. सरकारकडून त्याची चौकशी सुरू आहे. अतिक्रमणाबाबत गंभीर विचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे या वेळी अभिनंदन केले. शासकीय जमिनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेची आहे. सरकारी जागेवरील अतिक्रमणांना खतपाणी घालणाऱ्या आणि त्याकडे दुर्लक्ष केलेल्या महसूल विभागातील तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी कपिल पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, काही लोकप्रतिनिधींना मात्र गोदामे अनधिकृत असल्याची चर्चा उपस्थित करण्यात रस आहे. यावर सकारात्मक उपाय काय सुचवता येईल, यावर चर्चा होत नाही, याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. गोदामांमध्ये लागणाऱ्या आगीबाबत चिंता व्यक्त केली आहे. या भागाच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीए प्राधिकरणाची आहे. त्यांच्याकडे वेळोवेळी आपण स्वतः केलेल्या मागणीनंतरही या भागात अग्निशमन यंत्रणा उभी केली नाही. या एमएमआरडीए प्रशासन जबाबदार असून, त्यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
कांदळवनाबाबत सर्वेक्षण गरजेचे
कांदळवनात अतिक्रमण केल्याच्या तक्रारी केल्या जातात; पण वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहणी गरजेची आहे. गुगलद्वारा केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात जमिनीवर हिरवळ दिसते. ती नक्की कांदळवनाची आहे की, भाताची का गवताची आहे स्पष्ट होत नाही. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे, असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
स्वपक्षातील आमदारांना घरचा आहेर
विधान परिषदेमध्ये भाजप पदवीधर आमदार निरंजन डावखरे व प्रवीण दरेकर यांनी भिवंडीतील अनधिकृत गोदाम आणि त्यांना लागणाऱ्या आगीवर लक्षवेधी उपस्थित करत चर्चा केली. समाजवादी आमदार रईस शेख यांनी यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. या विरोधात पाटील यांनी आवाज उठवताना लोकप्रतिनिधींना अधिवेशन काळातच भिवंडी गोदामांचा प्रश्न कसा आठवतो, असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे. या माध्यमातून स्वपक्षातील आमदारांनाच त्यांनी घरचा आहेर दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.