तीन प्रभागांत १३०० टन कचरा संकलन
तीन प्रभागांत १३०० टन कचरा संकलन
कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेत एका खासगी कंपनीमार्फत सात प्रभागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडून सातपैकी ड, जे आणि फ या तीन प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर उर्वरित चार प्रभागांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दोन महिन्यांत या तिन्ही प्रभाग क्षेत्रात राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत तब्बल एक हजार ३०० टनांहून अधिक कचरा संकलन केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्नच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १० पैकी सात प्रभागांतील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेला देण्यात आले आहे. महापालिकेच्या अ, ब आणि क वगळता उर्वरित सात प्रभाग क्षेत्रामध्ये हे स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या सातपैकी ड, जे आणि फ या तिन्ही प्रभागांत पूर्ण क्षमतेने कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम सुरू केले आहे, तर उर्वरित चार प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत ती पूर्ण होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
तीन सत्रात संकलन
सध्याच्या घडीला या तिन्ही प्रभागांमध्ये दररोज सकाळी ६ ते २, दुपारी २ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा वेळापत्रकानुसार कचरा संकलनाचे काम केले जात आहे. तसेच लोकांना या वेळा माहिती होण्यासाठी, कचऱ्याचे ओला आणि सुका वर्गीकरणाबाबत जागृती करण्यासाठी, सुमित एल्कोप्लास्टमार्फत आयइसी (माहिती, शिक्षण आणि संवाद) पथक घरोघरी भेट देत आहे. तसेच कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरही स्पीकर यंत्रणा लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
प्रभागांतील काही ठिकाणी पूर्ण स्वच्छता करूनही त्यानंतर लोकांकडून सतत कचरा टाकण्यात येत असून, अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कॉम्पॅक्टर कंटेनर ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून मोकळ्या जागेमध्ये पडणारा कचरा त्या कॉम्पॅक्टर कंटेनरमध्ये जाईल. परिसर स्वच्छ राहण्यासह हा कचरा उचलणेही सोयीस्कर ठरेल, असेही अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच काही अपवाद वगळता ड, जे आणि फ प्रभागांमध्ये सुरू असलेल्या या स्वच्छता उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
सर्वच प्रभागांमध्ये प्रभावी स्वच्छता
उर्वरित ग आणि ह प्रभागाचे या महिनाअखेरपर्यंत आणि उरलेले आय-जे प्रभागांची हस्तांतरण प्रक्रिया ऑगस्ट अखेरीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांनंतर या सातही प्रभागांमध्ये अतिशय परिणामकारकपणे स्वच्छता दिसून येईल. तसेच या सात प्रभागांतील सफाई कर्मचारी यंत्रणा ही अ, ब आणि क प्रभागांसाठी उपलब्ध होणार आहे. या प्रभागांतही आणखी चांगली स्वच्छता राखली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
कचरा संकलन :
ड प्रभाग (१९ मे ते २ जून)
कचऱ्याची ठिकाणे - १००
कचरा संकलन - ४३६ टन
मनुष्यबळ - ५०-५५ सफाई कर्मचारी
वाहनांची संख्या - लहान मोठ्या मिळून ७-८ वाहने
जे प्रभाग (२४ मे ते २२ जून)
कचऱ्याची ठिकाणे - ८० पेक्षा जास्त
कचरा संकलन - ८१७ टन
मनुष्यबळ - ३५- ४० सफाई कर्मचारी
वाहनांच्या संख्या ८- ९ गाड्या
फ प्रभाग (२४ जून ते ३ जुलै)
कचऱ्याची ठिकाणे - ३३
कचरा संकलन - ७० टन
मनुष्यबळ - १२ ते १५ कर्मचारी
वाहनसंख्या - ३-४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.