खाटा वाढवण्यासाठी जागेची अडचण, कामा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात नवीन सुविधा

खाटा वाढवण्यासाठी जागेची अडचण, कामा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात नवीन सुविधा

Published on

केईएमच्या वन स्टॉप सेंटरमध्ये एकच खाट!
जागेअभावी अंथरुण टाकून उपचाराची वेळ
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : लैंगिक आणि घरगुती हिंसाचारातील पीडित महिला, मुलींसाठी केईएम रुग्णालयात २०१९मध्ये वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले. त्यास निर्भया केंद्र असेही संबोधण्यात आले; मात्र मागील सात वर्षांपासून या केंद्रात जागेअभावी एकाच खाटेची सुविधा असल्याने एकापेक्षा अधिक पीडिता आल्यास त्यांच्यावर जमिनीवर अंथरुण टाकून उपचार केले जात आहेत. दरम्यान, जागा उपलब्ध झाल्यास खाटा वाढवून दिल्या जातील तसेच राज्यभरात ५५ केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
मुंबईत दरवर्षी सुमारे ८५० ते ९०० बलात्काराच्या घटनांची नोंद होते. याशिवाय घरगुती हिंसाचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. यातील पीडित महिलांना उपचार आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते २०१९मध्ये केईएम रुग्णालयात वन स्टॉप सेंटरचे उद्‍घाटन करण्यात आले. हा प्रकल्प केंद्र सरकार पुरस्कृत असून, तो महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक केंद्रात सर्व सेवांसह पाच खाटा आणि पाच दिवसांच्या तात्पुरत्या मुक्कामाची सेवा देणे अपेक्षित आहे; मात्र केईएम रुग्णालयात जागेअभावी केवळ एका खाटेची सुविधा असून, जादा पीडिता आल्यास चटई, मॅट्रेस तसेच फोल्डिंग खाटेची सोय केली जाते. सप्टेंबरमध्ये कामा रुग्णालयातही नवे केंद्र सुरू होणार असल्याचे मुंबई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
-----
केंद्रातील उपलब्ध सुविधा
- समुपदेशन
- मानसिक आधार
- पोलिसी कार्यवाहीबाबत मार्गदर्शन
- वैद्यकीय सुविधा
- कायदेशीर सेवा
- न्याय व विधी सेवा
---
मार्गदर्शक सुविधांची अंमलबजावणी नाही
केईएममधील या केंद्रासाठी एक कोटीहून अधिक खर्च झाला आहे. आम्ही वारंवार अतिरिक्त खाटा आणि विस्ताराची मागणी केली, पण ही सुविधा उपलब्ध झालेली नाही. मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी नीट झालेली नाही, असे केईएम सेंटरचे व्यवस्थापन करणाऱ्या स्नेहा एनजीओच्या कार्यक्रम संचालक डॉ. नायरीन दारूवाला म्हणाल्या. महिलांची संख्या वाढल्यास आम्ही त्यांना जमिनीवर अंथरुण टाकून व्यवस्था करतो, असे त्या म्हणाल्या.
......
कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयात एक नवीन केंद्र १,५०० चौरस फूट क्षेत्रात तयार केले जात आहे. ही नवीन सुविधा शहरी भागातील पीडितांना चांगल्या प्रकारे सेवा देईल. येथे पाच खाटा, प्रशिक्षित समुपदेशक आणि एनजीओ भागीदारीद्वारे कायदेशीर सहाय्य उपलब्ध केले जाईल.
- डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा रुग्णालय
------
येत्या काळात वन स्टॉप सेंटरमधील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक ओएससीमध्ये पाच खाटा हव्यात. आता ५५ केंद्रांची मान्यता मिळाली आहे. त्यापैकी सुरू झालेल्या केंद्रात मनुष्यबळ भरण्याचे आणि फर्निचरचे काम सुरू आहे.
- नयना गुंडे, आयुक्त, महिला व बालविकास विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com